संगीतमय कार्यक्रम : कळंब येथे रसिकांचा उदंड प्रतिसाद, मान्यवरांची उपस्थिती कळंब : मराठी नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे ‘गुढीपाडवा’. शेतकऱ्यांसाठी हा सण तर अतिशय महत्वाचा असतो. या काळात वसंत ऋतूच्या संकेताची चाहुल लागलेली असते आणि अशातच कळंब येथे ‘पाडवा पहाट’च्या निमित्ताने ‘सूर निरागस हो’ या संगीतमय कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरुवात झालेल्या दिवसाचा प्रारंभही मधूर गोडवा घेऊन आला. प्रशांत डेहनकर मित्र मंडळाच्यावतीने गुढी पाडवानिमित्त आयोजित ‘पाडवा पहाट’ हा कार्यक्रम जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या प्रांगणात उपस्थित रसिकांना नवीन उभारी देऊन गेला. सूर-स्वरांच्या गुंजनात, पाखरांच्या किलबिलाटात पहाटची सुरुवात उत्तरोत्तर प्रसन्न होत गेली. गायक प्रा.अतुल शिरे, धनराज कुटे, विठ्ठल ठाकरे, प्रशांत डेहनकर, भारती कदम, ऐश्वर्या घोरपडे यांच्या मधूरस्वरांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. ‘स्वामी गणराज माझा.....’ या गणपती स्तोत्राने मैफलीत रंगत भरायला सुरुवात केली. सुरवातीपासून रंगलेल्या या मैफलचा टेम्पो शेवटपर्यंत कायम होता. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त महेश काळे यांची ‘अरुणी किरणी’ ही भैरवी प्रा.अतुल शिरे यांनी सादर करुन सर्वांना त्यांच्यातील गायनकौशल्याच्या परिचय दिला. प्रशांत डेहनकर यांनी सादर केलेले ‘धिरे-धिरे सुबह हुई’ हे गाणे रसिकांच्या आठवणीत राहतील असेच होते. ‘मन मंदिरा...’ हे ‘कट्याळ काळजात घुसली’ या चित्रपटातील गाण्याने सर्वांच्या टाळ्या घेतल्या. ‘सुर निरागस हो’ हे टायटल स्वाँग सर्वांच्या स्मरणात राहील असेच होते. विठ्ठल ठाकरे यांनी ‘झन झन झन छेडीयेल्या तारा’ हे गाणे हुबेहुब सादर केले. ‘उठी श्रीराम पहाट झाली...’ हे गाणे भारती कदम यांनी अतीशय सुंदर सादर केले. ‘केव्हा तरी पहाटे’, ‘गंध फळांचा सांगून गेला..’ यासह अनेक गाण्यांना रसिकांची उर्त्फूत दाद मिळाली. ‘सूर निरागस हो’ या टायटल गाण्यावर तर सर्वजण चिंब झाले. कार्यक्रमाला माजी मंत्री प्रा.वसंत पुरके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, नगराध्यक्ष दिगांबर मस्के, उपनगराध्यक्ष मनोज काळे, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार रणजित भोसले, चिंतामणी देवस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर चांदोरे, पोलीस उपनिरीक्षक संघरक्षक भगत, मुरलीधर डेहनकर, प्रतीक डेहनकर आदीसह रसिकांची उपस्थित होती. (तालुका प्रतिनिधी)
‘सूर निरागस हो’ उभारी देऊन गेले
By admin | Published: April 01, 2017 12:18 AM