लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : गावात दारू विक्री करणाऱ्या युवकाचा पोलिसांच्या धाडी दरम्यान संशयास्पद मृत्यू झाला. परंतु त्याचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास तालुक्यातील इचोरा गावात ही घटना घडली.महेंद्र देवराव गायकवाड (३५) रा. इचोरा ता. आर्णी असे मृताचे नाव आहे. मंगळवारी दुपारी पोलिसांचे एक पथक सावळी सदोबा परिसरातील इचोरा गावात दारू पकडण्यासाठी आले होते. महेंद्रच्या घरीसुद्धा दारू विकली जात असल्याची टीप पोलिसांना मिळाली. त्यामुळे या पथकाने त्याच्या घराकडे मोर्चा वळविला. पोलीस आल्याची कुणकुण लागताच महेंद्र गावात पळत सुटला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून मारहाण केली व त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याची पत्नी विद्या हिने केला आहे. बेशुद्ध महेंद्रला आर्णी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. यावेळी त्याचे कुटुंबीय व नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयासमोर एकच आक्रोश केला. महेंद्रच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. पोलिसांनी महेंद्रचा बळी घेतला असून त्यांच्यावर कारवाईची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. वृत्तलिहिस्तोवर पोलिसात तक्रार दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे मृताच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.महेंद्रला ताब्यातच घेतले नाही तर मारहाण कशी ?- अमोल कोळीदरम्यान पांढरकवडा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मंगळवारी दारू विरोधात संयुक्त मोहीम उघडली गेली. इचोरी गावातूनही अवैध दारूबाबत अनेक तक्रारी होत्या. म्हणून गावातील पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती समिती अध्यक्ष आदींना सोबत घेऊन धाडी घातल्या. मात्र पोलीस गावात आल्याचे कळताच महेंद्र पळून गेला. त्यामुळे महेंद्रला ताब्यात घेण्याचा व मारहाणीचा संंबंधच येत नसल्याचे कोळी यांनी प्रस्तूत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.महेंद्रवर दारूच्या अनेक केसेस - ठाणेदार चौधरसदर प्रतिनिधीने, संबंधित पारवा पोलीस ठाण्याचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक गोरख चौधर यांच्याशी संपर्क साधला असता, पांढरकवडा, घाटंजी व पारवा पोलीस ठाण्याहद्दीत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाची दारू, जुगाराविरुद्ध संयुक्त कारवाई केली जात होती, असे त्यांनी सांगितले.महेंद्रवर यापूर्वी अनेकदा दारूच्या केसेस दाखल करण्यात आल्या. परंतु प्रत्येक वेळी तो पळून जात होता. मंगळवारीसुद्धा तो पळून गेला. त्याला पोलिसांनी कोणत्याही प्रकारची मारहाण केली नाही. त्यामुळे पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू होण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे ठाणेदार चौधर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
दारू विक्रेत्याचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 12:03 AM
लोकमत न्यूज नेटवर्क आर्णी : गावात दारू विक्री करणाऱ्या युवकाचा पोलिसांच्या धाडी दरम्यान संशयास्पद मृत्यू झाला. परंतु त्याचा मृत्यू ...
ठळक मुद्दे पोलिसांवर मारहाणीचा आरोप : पत्नी व नातेवाईकांचा आक्रोश, रुग्णालयापुढे गर्दी