विद्यार्थिनींना अपमानास्पद वागणूक भोवली : पाणी मागण्यासाठी गेलेल्या विद्यार्थिनींना गावी जाण्याचा सल्लाहिवरी : पिण्याच्या पाण्याची तक्रार घेऊन गेलेल्या विद्यार्थिनींना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या हिवरी येथील शासकीय आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांना प्रकल्प अधिकाऱ्यांनी तात्काळ निलंबित केले. विशेष म्हणजे मुख्याध्यापकाने विद्यार्थिनींना वसतिगृहातून निघून जाण्यास सांगितल्याने रात्री या मुली हिवरीच्या बसस्थानकावर आल्या होत्या. त्यावेळी गावातील जागरुक नागरिकांमुळे प्रकरण उघडकीस आले. हिवरी येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनींनी मंगळवारी रात्री वसतिगृहात भोजन केले. मात्र त्याठिकाणी पाण्याची व्यवस्था नव्हती. परिणामी या मुली मुख्याध्यापक ए.एस. खिल्लारे यांच्या निवासस्थानी गेल्या. त्याठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्याची विनंती केली. मात्र मुख्याध्यापकाने या विद्यार्थिनींना शिवीगाळ करीत वसतिगृहातून निघून जाण्यास सांगितले. त्यामुळे रात्री ८ वाजताच्या सुमारास या मुली बॅगा घेऊन हिवरीच्या बसस्थानकावर आल्या. त्याठिकाणी गावातील अरुण वाकडे, पोलीस पाटील दिगांबर शहारे, नितीन गावंडे यांना या मुली दिसल्या. रात्री या मुली कुठे जात आहे, अशी विचारणा केल्यावर संपूर्ण प्रकार पुढे आला. त्यामुळे गावकऱ्यांसह या मुली वसतिगृहात पोहोचल्या. गावकऱ्यांनी मुख्याध्यापकांना जाब विचारला असता त्यांनाही उडवाउडवीची उत्तर दिली. शेवटी पांढरकवडा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाला ही माहिती देण्यात आली. त्यावरून प्रकल्प अधिकारी दीपककुमार मिना यांनी यवतमाळ ग्रामीण पोलिसांना हिवरी येथे पाठविले. पोलिसांनी रात्री प्रकरण शांत केले. दरम्यान, बुधवारी सकाळी या प्रकाराची दखल घेत दीपककुमार मिना यांनी सहायक प्रकल्प अधिकारी शेषराव घोडमारे यांना हिवरी येथे पाठविले. त्यांनी मुली आणि अधीक्षकांकडे चौकशी केली. तसेच विद्यार्थिनींकडून लेखी तक्रारही घेतली. त्यानंतर प्रकल्प अधिकारी दीपककुमार मिना यांनी मुख्याध्यापक खिल्लारे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. (वार्ताहर)
हिवरी शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक निलंबित
By admin | Published: March 17, 2016 3:02 AM