यवतमाळ : मृत मोठ्या भावाची पत्नी जादुटोणा, करणी करते असा संशय घेऊन दीराने कुटुंबीयांच्या मदतीने भावजयीचा खून केला. पाच वर्षापूर्वीच्या या घटनेत मंगळवारी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही. गावंडे यांनी चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जयानंद धबाले, आशाबाई धबाले, किरण धबाले व निरंजन धबाले सर्व रा. तरोडा ता. उमरखेड अशी आरोपींची नावे आहे.
मृतक सुनंदाबाई ही अंगणवाडी सेविका होती. पतीच्या निधनानंतर ती तरोडा येथे आरोपींच्या घरासमोरच राहत होती. त्यांचा एक मुलगा सैन्यात नोकरीस असून दुसरा मुलगा स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुणे येथे राहत होता. सुनंदा सात वर्षाच्या नातीसह एकटीच राहत होती. परंतु आरोपी जयानंद याचे कुटुंब रोजमजुरी करून जगत होते. दोन्ही कुटुंबातील आर्थिक परिस्थितीमुळे वादाचे वातावरण होते.
सुनंदानेच करणी केल्यामुळे आपली प्रगती होत नाही, असे जयानंदची पत्नी आशाबाईला वाटत होते. शिवाय विधवा सुनंदाने करणी केल्यामुळेच आपण नेहमी आजारी पडतो, असाही तिला संशय हाेता. यातूनच त्यांचा नेहमी वाद व्हायचा. सुनंदाबाईच्या मुलाने हे प्रकरण तंटामुक्त समितीकडेही नेले होते. मात्र, १ मे २०१५ रोजी आरोपींनी सुनंदाच्या घरी जावून कुऱ्हाडीचे वार करून तिचा खून केला. या प्रकरणात किशोर धबाले याने पोफाळी पोलिसात तक्रार दाखल केली. एपीआय एस.एम. भडीकर, एस.ए. ठाकूर यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. एकंदर दहा साक्षीदार व प्रत्यक्षदर्शी यांची साक्ष घेण्यात आली.
गुन्हा सिद्ध झाल्यामुळे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.बी. गावंडे यांनी भादंविचे कलम ३०२ नुसार जन्मठेप, भादंविचे कलम ४५२ नुसार दोन वर्षाची शिक्षा व प्रत्येकी ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिन्याचा सश्रम कारावास ठोठावला. या खटल्यात शासनातर्फे ॲड. महेश निर्मल यांनी युक्तीवाद केला. तर जमादार दिलीप राठोड, राहुल मारकंडे यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.
सात वर्षाच्या नातवाची साक्ष ठरली महत्वाची
सुनंदाबाईला आरोपी कुऱ्हाडीने ठार करीत असताना तिचा सात वर्षाचा नातू सार्थक याने संपूर्ण घटनाक्रम पाहिला. प्रत्यक्षदर्शी म्हणून त्याची साक्ष या खटल्यात महत्वाची ठरली.