वणी (यवतमाळ) : तालुक्यातील राजूर कॉलरी येथील एका २८ वर्षीय महिलेचा मृतदेह तिच्याच घरातील खाटेवर संशयास्पदरीत्या आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. सोमवारी पहाटे ही घटना उघडकीस आल्यानंतर वणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तांत्रिक पद्धतीने तपास करणाऱ्या पथकालाही यवतमाळ येथून पाचारण करण्यात आले होते. श्वानपथकही घटनास्थळी दाखल झाले होते.
संगीता ऊर्फ राणी राकेश केवट असे मृत महिलेचे नाव आहे. मृतदेह आढळून आल्यानंतर राजूर कॉलरीचे पोलीस पाटील वामन बलकी यांनी या घटनेची माहिती वणी पोलिसांना दिली. माहिती मिळताच, वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, ठाणेदार रामकृष्ण महल्ले व पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरील एकूण परिस्थिती लक्षात घेता, यवतमाळ येथून घटनास्थळावर श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. तसेच तांत्रिक तपास करणारे पथकही यवतमाळ येथून घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.
घटनेच्या आदल्या दिवशी म्हणजे रविवारी रात्री संगीता व तिचा पती राकेश या दोघांमध्ये कौटुंबिक कारणावरून चांगलाच वाद झाला होता. त्यानंतर सोमवारी सकाळी राहत्या घरात संगीताचा मृतदेह आढळून आला. ही घटना उजेडात आल्यानंतर संगीताचा खूनच करण्यात आल्याची चर्चा परिसरात होती. पोलिसांनाही तीच शंका होती. सायंकाळी शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला. संगीताचा मृत्यू फाशी लागल्याने झाल्याचे अहवालात म्हटले आहे. संगीताने सोमवारी सकाळी फाशी घेऊन आत्महत्या केली, त्यावेळी तिचा पती कुठे होता, हा प्रश्नदेखील आता पोलिसांच्या तपासाचा भाग झाला आहे. या प्रकरणी तूर्तास वणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
बॉक्स-पोलीस म्हणतात, आत्महत्या; चर्चा मात्र खुनाचीच
महिलेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाबाबत वणीचे एसडीपीओ संजय पुज्जलवार यांना विचारणा केली असता, त्यांना तूर्तास हा आत्महत्येचाच प्रकार असल्याचे सांगितले. या प्रकरणाची चौकशी केली असता, संगीताने फाशी घेतल्यानंतर तिच्या पतीनेच तिचा मृतदेह खाली उतरवून खाटेवर ठेवला, अशी माहिती मिळाल्याचे पुज्जलवार यांनी स्पष्ट केले. असे असले ही खुनाचीच घटना असल्याची चर्चा राजूर येथे सोमवारी दिवसभर होती.