महागाव (यवतमाळ) : तालुक्यातील काळी दौलत खान वनपरिक्षेत्र अंतर्गत बारभाई तांडा शिवारात मृत बिबट आढळून आला. यामागे घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोमवारी दुपारी वनपरिक्षेत्र अधिकारी आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अमित झा यांनी घटनास्थळाला भेट दिली.
मृत बिबट्याचे वय अंदाजे चार ते पाच वर्षे आहे. वन विभागाची गस्त नसल्यामुळे मृत्यू पावलेला बिबट वन विभागाच्या निदर्शनास आला नाही. गावकऱ्यांनीच या घटनेची माहिती वन विभागाला दिली. काळी दौलत खान वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत आतापर्यंत बिबट्याचे सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यामध्ये आणखी एक भर पडली. बिबट्याचे सर्व अवयव शाबूत असल्यामुळे घातपाताची शक्यता डॉ. अमित झा यांनी फेटाळून लावली. बिबट्याचे नमुने प्रयोगशाळेला पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.