यवतमाळ :
सुन्या सुन्या मैफलीत माझ्या
तुझेच मी गीत गात आहे
अजूनही वाटते मला की
अजूनही चांदरात आहे...
अशा आर्त स्वरांनी क्षणभर ‘शक्तिस्थळ’ही झंकृत झाले. संगीताच्या नि:सीम साधक आणि ‘लोकमत सखी मंच’च्या संस्थापक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मंगळवारी रात्री ‘स्वरांजली’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दर्डा उद्यान स्थित ज्योत्स्ना दर्डा यांचे समाधीस्थळ असलेल्या ‘शक्तिस्थळ’च्या हिरवळीवर प्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर आणि संगीतकार लिडियन नादस्वरम यांनी एकापेक्षा एक सरस रचना सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
एकाचवेळी २० वाद्ये वाजविण्याचे अद्भूत कौशल्य दाखवून यावेळी केवळ १६ वर्षे वय असलेल्या लिडियन नादस्वरम यांनी उपस्थितांना चकित केले. प्रारंभीच त्यांनी पियानोवर छेडलेल्या ‘सूरज्योत्स्ना ॲन्थम’ने वातावरण भारून टाकले. त्यानंतर गिटार, ड्रम, जॅझ अशी कितीतरी वाद्ये वाजवीत त्यांनी यवतमाळकरांना ‘राॅक संगीताची’ मेजवानी दिली. त्यानंतर आर्या आंबेकर यांनी ‘गणेश वंदने’ने सुरुवात करीत ‘राॅक’मध्ये हरविलेल्या रसिकांना पुन्हा तलम भावगीतांकडे खेचून आणले. शिवाय संत पुरंदरदास यांची कन्नड भाषेतील ‘भाग्यदा लक्ष्मी’ ही रचना पेश करून मैफलीला ‘वैविध्या’चे कोंदण बहाल केले. पण, मैफलीचा रंग खऱ्याअर्थाने गहिरा झाला, तो ‘सुन्या सुन्या मैफलीत माझ्या’, ‘केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली’ या गीतांनी. नुकत्याच इहलोक सोडून गेलेल्या लता मंगेशकर आणि नुकताच ज्यांचा स्मृतिदिन झाला, ते सुरेश भट यांच्या शब्द-सुरांच्या साक्षीने संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांचे स्मरण करण्यात आले. ‘स्मरल्या मला न जेव्हा माझ्याच गीत पंक्ती, मग ओळ शेवटाची सुचवून रात्र गेली...’ अशा ओळींनी ‘स्वरांजली’चा आशय जिवंत केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘लोकमत सखी मंच’च्या संस्थापक ज्योत्स्ना दर्डा यांना पुष्पांजली अर्पण करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुजा घाडगे यांनी केले, तर आर्याच्या मैफलीचे निवेदन विनया देसाई यांनी केले. हजारो रसिकांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.
ताल-सुरांचे नवनवे प्रयोग
एकाचवेळी दोन पियानो वाजवीत लिडियन नादस्वरम यांनी दोन रचना पेश केल्या. एक होती ‘मिले सूर मेरा तुम्हारा’, तर दुसरी होती ‘जन गण मन अधिनायक जय हे’.. पियानोवर हे राष्ट्रगीत वाजताच सर्वच्या सर्व रसिक उभे राहिले, तर आर्या आंबेकर यांनी ‘वंदे मातरम्’ गीताने मैफलीचा समारोप करून नवा पायंडा पाडला.
वाद्यवृंदांचा सत्कार
यावेळी गायिका आर्या आंबेकर, निवेदिका विनया देसाई, संगीतकार लिडियन नादस्वरम, तसेच लिडियनचे वडील सतीशकुमार विपरल्ला यांच्यासह अनिल गाडगीळ (किबोर्ड), आदित्य आठल्ये (तबला), अभिजित बडे (वेस्टर्न रिदम), राहुल मानेकर (हार्मोनियम), ऋग्वेद पांडे (लिड गिटार), प्रवीण लिहितकर (लिड गिटार) या सर्व वाद्यवृंदांचा सत्कार करण्यात आला. लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, लोकमतचे प्रबंध संचालक देवेंद्र दर्डा, किशोर दर्डा आदी मान्यवरांच्या हस्ते कलावंतांचा सत्कार झाला.