भाव घसरले : केंद्र बंद होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांची गर्दी दारव्हा : बाजारपेठेत तुरीचे भाव अचानक खाली आल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी नाफेडच्या तूर खरेदी केंद्राकडे कल वळविला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणचे केंद्र बंद झाल्याने दारव्हा केंद्रही बंद होईल, या धास्तीने शेतकऱ्यांनी झुंबड केली आहे. येथील वखार महामंडळाच्या गोदामाजवळ गत महिनाभरापासून नाफेडच्या तूर खरेदीस सुरुवात झाली आहे. खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात तुरीची आवक होत असल्याने ग्रेडींग व वजनमापासाठी कालावधी लागत आहे. किमान आधारभूत किमत खरेदी केंद्रे लवकरच बंद होईल, असे समजून शेतकरी या केंद्रावर गर्दी करीत आहे. यामुळे खरेदी केंद्रावरील यंत्रणांवर ताण पडत आहे. या संदर्भात पुणे येथील पणन संचालक सुनील पवार यांनी नुकतेच सर्व विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सर्व सभापती व सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती यांना एफएक्यू दर्जाच्या तुरीची खरेदी करण्यासाठी सध्या तूर खरेदी केंद्र कार्यरत असून प्रत्यक्ष तूर खरेदीचे कामकाज येथे सुरू आहे. तरी याबाबत शेतकऱ्यांना अवगत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या बाजारपेठेत तीन हजार ८०० ते तीन हजार ९०० या दराने तूर खरेदी करीत आहे. केंद्र शासनाने तूर या शेतमालासाठी पाच हजार ५० रुपये प्रतिक्विंटल किमान आधारभूत किमत निश्चित केलेली आहे. किमत स्थिरता निधी या योजनेअंतर्गत तूर खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य पणन महासंघ, मुंबई यांच्या नाफेड या संस्थेची राज्यस्तरीय एजन्सी म्हणून नियुक्ती केलेली आहे. या एजन्सीमार्फत दारव्हा तालुक्यात सध्या तूर खरेदी प्रक्रिया सुरू आहे. तेंव्हा हे खरेदी केंद्र बंद होण्याची भिती शेतकऱ्यांमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी तूर उत्पादक शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली. कारण हे केंद्र बंद झाल्यास बाजारपेठेत यापेक्षाही कमी दरात तूर विकल्याशिवाय शेतकऱ्यांकडे दुसरा पर्याय राहणार नाही. (प्रतिनिधी)
तूर खरेदी केंद्रावर झुंबड
By admin | Published: February 23, 2017 1:08 AM