महागाव : कृषी अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावूनही अद्याप खुलासा सादर न करणाऱ्या काही कृषी केंद्रांवर परवाना निलंबनाची टांगती तलवार आहे.
तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांबाबत बियाणे, कीटकनाशके, रासायनिक खते या संदर्भात शेतकऱ्यांकडून अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. प्रशांत नाईक यांच्या मार्गदर्शनात तालुका कृषी अधिकाऱ्यांनी कृषी केंद्र तपासणी मोहीम हाती घेतली. मागील महिन्यात काळी (दौ.) येथील सहा कृषी केंद्रात धडक देऊन तपासणी करण्यात आली. तेथे काही अनियमितता आढळून आली हाेती. त्या कृषी केंद्र चालकांना तत्काळ नोटीस बजावण्यात आल्या होत्या.
दरम्यान, २१ जुलै रोजी तालुक्यातील मुडाणा आणि महागाव येथील ६ कृषी सेवा केंद्रे तपासण्यात आली होतीण या कृषी केंद्रातसुद्धा अनेक अनियमितता आढळून आल्या होत्या. त्यामुळे त्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यांनी नियमानुसार सात दिवसांच्या आत खुलासा सादर करायचा होता. परंतु संबंधित कृषी केंद्र संचालकांनी अद्याप खुलासा सादर केला नाही. त्यामुळे त्यांच्यावर परवाना निलंबनाची टांगती तलवार आहे.
बॉक्स
अशी आहे अनियमितता
साठा फलक अद्यावत नसणे, विक्री केलेल्या मालाची पावती दिल्यानंतर शेतकऱ्यांची त्यावर स्वाक्षरी न घेणे, यासारख्या अन्य बाबी तपासणीत आढळून आल्या होत्या. ही बाब व्यापारात अनियमितता स्पष्ट करणारी ठरली आहे.
कोट
कारणे दाखवा नोटीसला अद्याप उत्तर मिळाले नाही. त्यामुळे तालुका कृषी विभागाकडून जिल्हा स्तरावर अहवाल पाठविला जाणार आहे.
विजय मुकाडे, तालुका कृषी अधिकारी, महागाव.