कळंब : तालुक्यातील धोत्रा येथील तंटामुक्तीचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य सुधाकर साळुंके यांना गावातीलच दारूविक्रेता योगेश वैद्य याने बेदम मारहाण केली. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदविण्यात आला. परंतु अद्यापही पोलिसांनी आरोपीला अटक केलेली नाही. त्यामुळे आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी महिला मंडळाने पोलीस ठाण्यावर धडक देऊन ठाणेदार विजय जोंधळे यांना निवेदन सादर केले. गावामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारु विकली जात होती. या दारुविक्रीला अटकाव करीत गावात दारुबंदी करण्यात आली. यासाठी तंटामुक्तीचे अध्यक्ष सुधाकर साळुंके यांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळेच चिडून जाऊन त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. अवैध दारूविक्रीविरुद्ध आवाज उठविणाऱ्यांवर जर असे हल्ले होत असतील तर गावातील सुधारणांसाठी तसेच कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यास मदत करण्यामध्ये कोण पुढाकार घेईल, असा प्रश्न गावकऱ्यांकडून केला जात आहे. ठाणेदाराला दिलेल्या निवेदनावर शशिकला भोयर, सराबाई साळुंके, गंगू भगाडे, माया पाटील, जना साळुंके, जमना गजर, अन्नपूर्णा कोथे, वंदना गोधाडे, सुरेखा खोब्रागडे, नलू भोयर, चंपा मोरे, उषा वाईकर, बालाबाई भगाडे, मंदा भगाडे, मिरा गदई, रंजना कांबळे, कमल पाटील, सुनिता गदई, ताईबाई मुडीत, नलू साफळे, योगिता धुमाळ, राईबाई कोळे, शकुतला कोरवते, सुमित्रा साळुंके, कांता धुमाळ, इंद्रा साळुंके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)
तंटामुक्त अध्यक्षांना मारहाणीचे प्रकरण पेटले
By admin | Published: August 08, 2014 12:14 AM