कळंब : स्थानिक ग्रामीण रुग्णालयाला बुधवारी वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयाचा कारभार सुधारण्याच्या सूचना संबंधितांना केल्या. तहसीलदारांनी आठवड्यातून दोन वेळा रात्री केव्हाही रुग्णालयाला भेट देऊन त्यासंबंधीची नोंद घेण्याची सूचना केली. रुग्ण नोंदणी विभाग, प्रसूती वॉर्ड, पॅथॉलॉजी, औषधी वितरण विभाग, रुग्ण भरती विभाग आदी विभागात भेट देऊन तेथील परिस्थतीची माहिती घेतली. दाखल रुग्णांची चौकशी करून त्यांना मिळत असलेला उपचार आणि सेवेची माहिती घेतली. रुग्णालयाची साफसफाई आजच्या प्रमाणेच रोज केली गेली पाहिजे, असे ते म्हणाले. एक्स-रे मशीन नसल्याने रुग्णांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. याविषयी त्यांनी स्वत: लक्ष घालणार असल्याचे सांगितले. निवासस्थाने बांधुन आहे, परंतु पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे शासकीय निवासस्थाने धुळखात पडली आहे. १०८ रुग्णवाहिकेची सेवा व्यवस्थित दिली जात नाही, अशी तक्रार त्यांच्याकडे करण्यात आली. यावर त्यांनी उपायोजना करण्याविषयी आश्वस्त केले. रुग्णवाहिकेचा चालक आणि एक वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी तिवारी यांच्यासोबत आमदार डॉ.अशोक उईके, एसडीओ जनार्धन विधाते, तहसीलदार संतोष काकडे, वैद्यकीय अधीक्षक अंजली दाभेरे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
तहसीलदारांनी ग्रामीण रुग्णालयाची दोनदा आकस्मिक पाहणी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2015 3:14 AM