लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वातावरणामध्ये बदल होताच रुग्णालयांमध्ये लहान मुलांची संख्या वाढली आहे. शासकीय रुग्णालयाची ओपीडी दुपटीने वाढली आहे. आरोग्य विभागाच्या यंत्रणेने छोट्या बालकांसाठी स्वतंत्र वाॅर्ड तयार ठेवला आहे. मात्र कोरोनाचे रुग्ण नसले तरी डेंग्यू, मलेरिया, सर्दी, खोकला, ताप, रक्ताचे प्रमाण कमी असणे, बाळकफ असे विविध आजार असलेली छोटी मुले रुग्णालयांमध्ये वाढली आहे. शासकीय रुग्णालयांसोबतच खासगी रुग्णालयातही छोट्या बालकांची रुग्णसंख्या वाढली आहे. यामुळे गावापासून ते शहरापर्यंत रुग्णालयांमध्ये गर्दी पहायला मिळत आहे.
२० टक्के मुलांची कोरोना चाचणी- दररोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १५ ते २० बालके दाखल होत आहे. त्याच प्रमाणे खासगी रुग्णालयात मोठी संख्या आहे. - बालकांचा ताप उतरत नसेल तर शेवटचा पर्याय म्हणून कोरोना चाचणी केली जात आहे. त्यातील २० टक्के पाॅझिटिव्ह येतात.
डेंग्यू-मलेरियाची चाचणीडेंग्यू, मलेरिया आणि कोविडची लक्षणे सारखीच आहे. बहुतांश बालकांना पोस्ट कोविड असल्याचे पुढे आले आहे. त्यांच्यामध्ये ॲन्टिबाॅडीज असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका तेवढा नाही. प्रथमत: डेंग्यूची चाचणी करून लक्षणे जाणून घेतली जात आहे.
बालरोग तज्ज्ञ म्हणतात....
रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे. यामध्ये डेंग्यू मलेरियाचे रुग्ण जास्त आहे. एमआयएससी हा आजार काहींमध्ये पहायला मिळाला आहे. छोटी मुले आजारी पडल्यानंतर तात्काळ उपचार केल्यास पुढील त्रास पालकांना टाळता येतो. - डाॅ. स्वप्नील मानकर, भारतीय बालरोग संघटना, सचिव
वैद्यकीय महाविद्यालयात रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये विविध आजाराच्या रुग्णांचा समावेश आहे. या परिस्थितीत उपचारानंतर बालके बरी झाली आहेत. आता पालकांनी बालकांची काळजी घेणे आवश्यक आहे. - डाॅ. केशव केशवाणी, भारतीय बालरोग संघटना, अध्यक्ष
ही घ्या दक्षता
मुलांना पावसात बाहेर नेऊ नका, त्यांची विशेष खबरदारी घ्या.
घरातील कुलर रिकामे करा, आजूबाजूला डबके साचले असेल तर ते साफ करा.
मुलांना मास्क लावा, सॅनिटायझर आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.