यवतमाळ : राष्ट्रीय महामार्गांवर अपघाताचे प्रमाण वाढले असून त्यात दररोज कित्येकांचे बळी जात आहेत. हे अपघात रोखण्यासाठी वाहन चालकांमध्ये जनजागृती व व्यापक उपाययोजना कराव्या, अशी आग्रही मागणी लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी केली.
नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाबाबत दर्डा यांनी रविवारी येथील दर्डा उद्यानात मे. ‘दिलीप बिल्डकॉन कंपनीचे सहायक महाव्यवस्थापक रामअवतार त्यागी यांच्याशी विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा केली. त्यांनी अपघातास कारणीभूत अनेक बाबींकडे त्यागी यांचे लक्ष वेधले. या मार्गावर हुस्नापूर टोल बुथवर माजी आमदार-खासदारांना टोल माफ असताना फास्टॅगद्वारे पैसे कापले जातात. रिफ्लेक्टर नसलेली वाहने रस्त्यावर राहणे, जनावरांचा संचार यामुळे सुद्धा अपघात होत असल्याचे दर्डा यांनी सांगितले. त्यावर त्यागी म्हणाले, दुचाकी वाहनधारकांपैकी ४० टक्के लोकांकडे परवाना नसतो तर चारचाकी वाहनांचे ६० टक्के चालक मद्यप्राशन करून वाहन चालवितात. वाहतूक पोलिसांनी चुकीच्या मार्गाने ये-जा करणारी वाहने थांबवून त्यांना योग्य दिशा देणे अपेक्षित असते. वाहतूक नियमांबाबत जागरूकता नसणे हे वाढत्या अपघातामागील प्रमुख कारण आहे, असे त्यागी यांनी सांगितले. सध्याची पिढी वाढत्या अपघातातून वाचविण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये हेल्मेट सक्ती, सिट बेल्ट, वाहन मर्यादा, रिफ्लेक्टर लावणे, पार्किंग आदी वाहतूक नियमांबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी, त्यासाठी स्वयंसेवी संस्थांनीसुद्धा पुढाकार घ्यावा आदी सूचना विजय दर्डा यांनी केल्या. या सर्व सूचनांचे तातडीने पालन करू, अशी ग्वाही रामअवतार त्यागी यांनी विजय दर्डा यांना यावेळी दिली.अपघात रोखण्यासाठी व्यापक उपाययोजना - नितीन गडकरीदेशभर महामार्गांचे जाळे तयार करून कनेक्टीव्हीटी निर्माण करण्यात आली असली तरी रस्त्यांवर होणारे अपघात रोखण्यात आपण अपयशी ठरलो, अशी प्रांजळ कबुली केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच नागपूर येथे माजी खासदार विजय दर्डा यांच्याशी चर्चेदरम्यान दिली. मात्र हे अपघात रोखण्यासाठी आणखी व्यापक उपाययोजना करण्याबाबत आपले मंत्रालय काम करीत असल्याचेही गडकरी यांनी दर्डा यांना सांगितले.