सत्यपाल महाराज : नेर येथे उत्सव समितीतर्फे प्रबोधन कार्यक्रमनेर : क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी शेतकऱ्यांची मुलं शाळेत जावी अन् शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक क्रांती करावी, यासाठी शाळा उघडल्या. ‘शेतकऱ्यांचा आसूड’ या ग्रंथाच्या माध्यमातून जोतिरावांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार मांडला. आता शेती करून आत्महत्या करण्यापेक्षा ज्ञानाची उपासना करून जोतिरावांचा लढा पुढे न्या, असे आवाहन प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी केले.येथील काळे स्टेडियमवर सत्यपाल महाराज यांचे प्रबोधनपर कीर्तन झाले. महात्मा फुले जयंती उत्सव समितीद्वारा महात्मा फुले जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर नगराध्यक्ष वनिता मिसळे, उपाध्यक्ष पवन जयस्वाल, नगरसेवक सुभाष भोयर, उद्योजक संजय ठाकरे आदी उपस्थित होते. सत्यपाल महाराजांनी आपल्या खुमासदार शैलीत विविध विषयांना हात घातला. अनेक प्रश्न विचारून लोकांच्या मनात एक नवी जागृती घडवून आणली. शेतीत जास्तीत जास्त राबण्यापेक्षा छोटे-छोटे व्यवसाय करा, पोरीच्या लग्नात जास्त खर्च करू नका, व्यसने सोडा आणि ज्ञानाची उपासना करा, येणाऱ्या काळात आपणास ज्ञानाची लढाई लढावी लागेल, तरच आपलं भविष्य सुखकर होईल, असे ते म्हणाले. यावेळी येथील पूजा दुधे, वृषाली मेहर या सावित्रीच्या लेकींचा सत्कार करण्यात आला. महात्मा फुले यांच्या स्मारकासाठी जागा दान देणारे सुधीर कुळकर्णी यांचाही सत्कार करण्यात आला. सत्यपाल महाराजांना मानपत्र देण्यात आले. या मानपत्राचे वाचन विनोद गोबरे यांनी केले. संचालन संतोष अरसोड, प्रास्ताविक संदीप चौधरी, आभार संदीप ठक यांनी मानले. आयोजनासाठी महात्मा फुले जयंती उत्सव समिती कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. (तालुका प्रतिनिधी)
ज्योतिरावांचा लढा पुढे न्या
By admin | Published: April 12, 2017 12:06 AM