अविनाश साबापुरे
लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : सूर्योदयाच्या वेळचा ताजेपणा, सूर्यास्तावेळी घरी परतणारे पाखरांचे थवे, झाडावर कळी उमलून फूल होतानाचा क्षण.. असे दृश्य आजच्या धावपळीच्या जगात कोण न्याहाळत बसणार? पण नेमक्या याच गोष्टी निवांत पाहायच्या, त्यांचा फोटो काढायचा, मग त्याच्यावर एक निबंध लिहायचा, कविता लिहायची... हे शाळाबाह्य अन् निसर्गरम्य शिक्षण घेत आहेत खेड्यातील मुले.
कोरोनामुळे पहिली ते चौंथीच्या शाळा अजूनही बंदच आहेत. मुले घरी राहून-राहून कंटाळली. त्यातच ऑनलाइन शिक्षणाच्या अट्टहासापायी घरोघरी अँड्रॉइड मोबाइलही अवतरले. त्यातून मोबाइल गेममध्येच मुले गरफटण्याची भीती निर्माण झाली. पण या मोबाइलच्या दुष्टचक्रातूनही मुलांना संवेदनशील छंदाकडे खेचता येते, हे सुकळीतील शिक्षकांनी दाखवून दिले. येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अमोल पालेकर व उपक्रमशील शिक्षक संदीप कोल्हे यांनी हा अनोखा ‘रंगोत्सव सूर्याचा’ उपक्रम त्यासाठीच सुरू केला असून, मुले त्यात समरसून सहभागी होत आहेत.
शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट असलेला ‘परिसर अभ्यास’ हा भागही यानिमित्ताने शाळा बंद असूनही पूर्ण होत आहे. सूर्योदय व सूर्यास्त छटा अनुभवने, परिसरात होणारे बदल जसे-सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट, सायंकाळी थवा घरी परतणे, कळी उमलणे आदी बदलांचा सजिवांवर होणारा परिणाम मुलांना अनुभवता यावा, हा अनुभव कायमस्वरूपी स्मरणात राहावा, या हेतूने हा उपक्रम सुरू करण्यात आलाय. विशेष म्हणजे, पाहिलेल्या दृष्याचे मोबाइलमध्ये छायाचित्र घेणे व त्या प्रत्यक्ष अनुभवावर कविता, निबंध वा गोष्टीचे लेखन करणे असा ‘होमवर्क’ विद्यार्थ्यांना दिला जात आहे. विशेष म्हणजे, मुलेही उत्स्फूर्त छायाचित्र घेत आहेत व त्यावर लेखनही करीत आहेत.
शाळा सुरू झाल्यावर भरणार छायाचित्रांचे प्रदर्शन
निसर्गाचे सौंदर्य टिपून ते मनात साठविता यावे, त्यातून विद्यार्थ्यांची सौंदर्यदृष्टी वृद्धिंगत व्हावी हा आमच्या उपक्रमाचा उद्देश आहे. विद्यार्थी आपापल्या मोबाइलच्या कॅमेरातून सूर्योदय व सूर्यास्ताच्या छटा टिपून ‘चला नवे शिकूया’ या व्हाॅट्सॲप ग्रुपवर टाकतात. त्या चित्राविषयी चार ओळी लिहितात. त्या दिवसाच्या उत्तम छायाचित्राला बक्षीस दिले जाते. यानिमित्ताने संपूर्ण आठवड्यातील सूर्योदय व सूर्यास्त यांच्या वेळाही मुलांना लक्षात येत आहे. या सर्व छायाचित्रांचा संग्रह करून ‘रंगोत्सव सूर्याचा’ नावाने शाळेत प्रदर्शन भरविले जाणार आहे. नकळतच यातून छायाचित्रण कसे करावे, याचाही अनुभव मुलांना मिळतोय, असे सुकळीचे शिक्षक संदीप कोल्हे यांनी सांगितले.