पोलिसांची कारवाई : पुसदचा गांधी चौक ते आंबेडकर मार्ग पुसद : गत अनेक वर्षांपासून येथील गजबजलेल्या गांधी चौक ते डॉ. आंबेडकर चौक या रस्त्यावरील विक्रेत्यांचे अतिक्रमण हटविण्यात काही प्रमाणात यश आल्याने या रस्त्याने अखेर मोकळा श्वास घेतला. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई करीत अनेक विक्रेत्यांच्या हातगाड्या जप्त केल्या. त्यामुळे विक्रेत्यांचे धाबे दणाणले. नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले असून परिसरातील व्यावसायिकांनीसुद्धा सुटकेचा नि:श्वास सोडला. महात्मा गांधी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा १२० फुटांचा रस्ता पुसद शहरातील सर्वात मोठा रस्ता होय. मात्र काही वर्षांपासून या रस्त्यावर हातगाडी विक्रेत्यांनी ताबा मिळविला होता. त्यामुळे हा रस्ता अवघा २० फुटांचा झाला होता. या ठिकाणी विक्रेते हातगाडी लावून सकाळपासून रात्रीपर्यंत व्यवसाय करीत होते. भाजी, फळे, स्टेशनरी यासह विविध हातगाड्या अगदी रस्त्यावर मनमानी पद्धतीने लावल्या जात होत्या. त्यामुळे या व्यावसायिक संकुलात जाण्यासाठी ग्राहकांना रस्ता शोधावा लागत होता. मोठे वाहन तर सोडा दुचाकी कुठे उभी करायची असा प्रश्न निर्माण व्हायचा. या संदर्भात ‘लोकमत’ने ‘पुसद शहरात १०० फुटांचे अतिक्रमण’ असे वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत वाहतूक पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी धडक मोहीम हाती घेतली. विक्रेत्यांना सूचना देऊन रस्ता मोकळा करण्यास सांगितले. मात्र अनेक विक्रेत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. काही हातगड्या जप्त केल्या. त्यामुळे विक्रेत्यांचे धाबे दणाणले. व्यापार संकुलातील दुकानांसमोर हातगाड्या लावणे बंद झाले. रस्त्याच्या मधोमध पांढऱ्या पट्ट्याच्या आतच आता विक्रेते हातगाड्या लावून आपला व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे या रस्त्याने मोकळा श्वास घेतला. आता या रस्त्यावरून दुचाकी आणि चारचाकी वाहनांना ये-जा करणे सुकर झाले. यामुळे समाधान व्यक्त होत आहे. (कार्यालय चमू)
‘त्या’ रस्त्याने घेतला मोकळा श्वास
By admin | Published: March 13, 2017 1:03 AM