यवतमाळ : आयपीएल २०-२० क्रिकेट सामन्यातील चेन्नई सुपरकिंग व राजस्थान रॉयल सामन्यावर कारमध्ये बसून सट्टा घेणाऱ्या चौघांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहे. ही कारवाई शहरातील दारव्हा रोडवरील हॉटेल नंदिनीसमोर करण्यात आली. आरोपींकडून १३ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विवेक देशमुख व त्यांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना शहरातील दारव्हा रोडवरील हॉटेल नंदिनीसमोर उभ्या असलेल्या एका कारमध्ये काही इसम सट्टा घेत असल्याची माहिती मिळाली. यावरून पथकाने छापा मारला असता मोबाईल फोन व लॅपटॉपच्या सहाय्याने कारमध्ये हारजीतचा जुगार खेळला जात असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी रितेश फकीरचंद जोशी (३४) रा. बोरेले ले-आऊट यवतमाळ, देवेंद्र दिलीपकुमार कटियारा (२४) पळसवाडी कॅम्प सिंधी कॉलनी यवतमाळ, करण किशोर कमनानी (२८) रा. पळसवाडी कॅम्प सिंधी कॉलनी आणि राहुल अनिलराव वानखेडे (३०) रा. विदर्भ हाऊसिंग सोसायटी साई मंदिरजवळ अशा चारजणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सात मोबाईल, एमएच-२९-बीव्ही-९०९० या क्रमांकाची कार असा १३ लाख ७५ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. आरोपी रितेश जोशी व देवेंद्र कटियारा हे जुगार चालवित असल्याचे तर इतर दोघे सौदे लावण्याकरिता आले असल्याचे तपासात पुढे आले. आरोपीविरोधात गुन्हा नोंदवून त्यांना लोहारा पोलिसांकडे पुढील तपासकामी स्वाधीन करण्यात आले आहे.घाटंजी येथेही दोघावर गुन्हा दाखल
घाटंजी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पंगडी येथे अतुल रमेश दरेकर व त्याचे साथीदार स्वत: राहत्या घरी आयपीएल क्रिकेट सामन्यावर मोबाईल फोन व लॅपटॉपच्या सहाय्याने जुगार खेळवित असल्याचे समजल्यानंतर पथकाने तेथे छापा टाकून अतुल रमेश दरेकर (३२) रा. इस्तारीनगर घाटंजी व चेतन एकनाथ बहेकार (२५) रा. मोहाडा यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याजवळून १ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी घाटंजी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक विवेक देशमुख यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक योगेश रंधे, राहुल गुहे, साजीद शेख, बंडू डांगे, अजय डोळे आदींनी केली.