उमरखेड (यवतमाळ) : अतिवृष्टीमुळे खरिपाचा हंगाम उद्ध्वस्त झाला आहे. शासनाकडून मदतीच्या केवळ घोषणा सुरू आहेत. तर अतिवृष्टीच्या यादीत नाव नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांना पैसे मोजावे लागत आहेत. हा धक्कादायक प्रकार उमरखेड तालुक्यातील धनज येथे उघडकीस आला. प्रती शेतकरी ३०० रुपयेप्रमाणे लाच मागणाऱ्या तलाठ्याला एसीबीच्या पथकाने सोमवारी रंगेहाथ पकडले.
लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी या तलाठ्याने उमरखेडमधील सीएससी केंद्रातील युवकाचा वापर केला. गणेश सदाशिव मोळके (४३) असे आरोपी तलाठ्याचे नाव आहे. त्याने धनज येथील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या मदतीसाठी यादीमध्ये नाव नोंदविण्याकरिता पैशाची मागणी केली. याची तक्रार २३ ऑगस्ट रोजी शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. यावरून २५ ऑगस्ट रोजी एसीबीच्या पथकाने पडताळणी कार्यवाही केली. पंचांसमक्ष तलाठी गणेश मोळके याने शेतकऱ्यांना प्रती लाभार्थी ३०० रुपये लाचेची मागणी केली. ही रक्कम उमरखेड शहरातील आसरा कॉम्युटर मल्टीसर्विसेस येथील सौरभ संजय नाथे या खासगी व्यक्तीकडे देण्यास सांगितले.
ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे एसीबीचे पथक शेतकऱ्यांना घेऊन सौरभ नाथे यांच्याकडे पोहोचले. सौरभने शेतकऱ्यांकडून १५०० रुपये लाच पंचासमक्ष स्वीकारली. दबा धरून असलेल्या एसीबीच्या पथकाने तत्काळ सौरभ नाथे याला ताब्यात घेतले. त्यानंतर तलाठी गणेश मोळके यालाही अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अपर अधीक्षक अरुण सावंत, देविदास घेवारे, उपअधीक्षक शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर नालट, अब्दुल वसीम, राहुल गेडाम, सचिन भोयर, महेश वाकोडे, राकेश सावसाकडे, उपनिरीक्षक सुधाकर कोकेवार यांनी केली.
शेतकऱ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार
यंदा शेतकऱ्यांना निसर्गाने कधी नव्हे अशी चपराक दिली आहे. पावसाने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहे. शेतशिवार अजूनही पाण्याने तुडूंब भरलेले आहेत, घरात खाण्यासाठी दाणा शिल्लक नाही. होती नव्हती ती पुंजी शेतकऱ्यानी खरीप हंगामात खर्च केली. बँकांचे कर्ज डोक्यावर आहे.
दैनंदिन खर्च कसा भागवावा ही समस्या शेतकऱ्यांपुढे आहे. सरकार केवळ मदतीची घोषणा करीत आहे. अजूनही एक रुपया शेतकऱ्यांना मिळाला नाही. पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू असल्याचा केवळ दिखावा निर्माण केला जात आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांकडून पैसे उकळण्याचा प्रकार नीचपणाचा कहर आहे. शासकीय यंत्रणा टाळूवरचे लोणी खाण्यातही मागे पुढे पाहत नसल्याचे वास्तव आहे.