लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : पैनगंगा नदीत बुडालेल्या बालकाचे प्राण तानाजी जाधव यांनी वाचविले. त्याची दखल घेत उद्देश सोशल फाऊंडेशनतर्फे जाधव यांना वीरता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.काळेश्वर येथील पैनगंगा नदीत पोहताना शिवम आळणे हा मुलगा बुडत होता. त्याचवेळी या रस्त्याने जाणारे तानाजी जाधव यांनी क्षणाचाही विचार न करता नदीत उडी मारली. पहिल्या प्रयत्नात शिवमला बाहेर काढण्यात त्यांना यश आले नाही. दुसरा-तिसरा प्रयत्नही अपयशी ठरला. शेवटी चौथ्या प्रयत्नात शिवमचा हात त्यांच्या हाती लागला. आणि त्याला बाहेर काढता आले. परंतु नाका-तोंडात पाणी गेल्यामुळे शिवम कोणतीही हालचाल करीत नव्हता. तानाजी जाधव यांनी कृत्रिम श्वास देण्याचा प्रयत्न केला. थोड्याच वेळात शिवमची हालचाल सुरू झाली. त्यानंतर तानाजी यांनी त्याला उमरखेडचे डॉ.श्रीराम रावते यांच्याकडे भरती केले. डॉ.रावते यांनीही सर्व उपचार मोफत केले.हा सर्व घटनाक्रम उद्देश संस्थेला कळविण्यात आला. याची दखल घेत उद्देश संस्थेतर्फे तानाजी जाधव यांचा शाल, श्रीफळ व वीरता पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. उद्देश कपडा बँकतर्फे दोन नवीन शर्ट व पॅन्ट पीस तसेच शिवमला खाऊ देण्यात आला. तानाजी जाधव यांच्या शौर्याची दखल शासन दरबारी घेतली जावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उद्देश संस्थेचे अध्यक्ष दीपक ठाकरे यांनी सांगितले. या प्रसंगी उद्देश सोशल फाऊंडेशन व उद्देश कपडा बँकेचे अध्यक्ष दीपक ठाकरे, डॉ.विवेक कुळकर्णी, डॉ.श्रीराम रावते, डॉ.आशीष उगले, अमोल जाधव, अरविंद सूर्यवंशी, संदीप तेला, प्रशांत मामीडवार, जगदीश भुसावार, संदीप पाटील, गोविंद सोमानी, अविनाश रावते, माळवे, संतोष शिंदे, डॉ.वैभव गिरी आदी उपस्थित होते.
मुलाचे प्राण वाचविणाऱ्या तानाजींना वीरता पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 9:23 PM
पैनगंगा नदीत बुडालेल्या बालकाचे प्राण तानाजी जाधव यांनी वाचविले. त्याची दखल घेत उद्देश सोशल फाऊंडेशनतर्फे जाधव यांना वीरता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
ठळक मुद्दे‘उद्देश’ची दखल : उमरखेडच्या डॉक्टरांनीही केले मोफत उपचार