लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील पांढरकवडा मार्गावरील येरद शिवारात मध्यरात्री डिझेलचा टँकर टायर फुटल्याने उलटला. याची वार्ता परिसरातील गावात पसरताच डिझेलसाठी अनेक जण डबक्या, पाईप घेऊन टँकरकडे धावत सुटले. जमेल त्या पद्धतीने डिझेल काढण्यासाठी गर्दी उसळली होती.
सुरत येथून जीजे-१२बी-एक्स-३९६९ क्रमांकाचा डिझेल टॅंकर चंद्रपूरकडे जात होता. अचानक टायर फुटल्याने येरद शिवारात तो उलटला. यात गणेश मांगाराम व धर्मेश इशाराम दोघे रा. राजस्थान हे जखमी झाले. डिझेलचा टॅंकर उलटल्याचे कळताच परिसरातील गावातील नागरिकांनी प्लॅस्टिकच्या डबक्या, पिंप घेऊन टॅंकरमधून डिझेल काढण्यासाठी एकच गर्दी केली. टँकरमध्ये असलेले २९ हजार लिटर डिझेल अक्षरश: लुटून नेण्यात आले. अपघात घडल्यानंतर खानगाव, जोमडोह येथील उपसरपंच संतोष गदई यांनी जखमी चालक व वाहकाला बाहेर काढून उपचारार्थ हलविले. या प्रकरणी वृत्त लिहिस्तोवर पोलिसांनी कुठलीही नोंद घेतलेली नव्हती.