आॅनलाईन खेळखंडोबा : परीक्षेच्या तोंडावर दुरुस्तीचा सोपस्कार अविनाश साबापुरे यवतमाळ प्रत्येक विद्यार्थ्याकडे योग्य लक्ष देऊन अध्यापन करता यावे, यासाठी शिक्षकांची संचमान्यता केली जाते. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून शिक्षकांची संचमान्यता कुचकामी ठरत आहे. परीक्षा तोंडावर आली तरी अनेक शाळांना योग्य प्रमाणात शिक्षक मिळाले नाही. आता ऐन परीक्षेच्या तोंडावर शिक्षण संचालकांनी संचमान्यतेत दुरुस्ती करण्याचा देखावा निर्माण केला आहे. राज्यातील शाळांमधील शिक्षकांचे प्रमाण विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार योग्य राखण्यासाठी संचमान्यता केली जाते. त्यासाठी पूर्वी एखाद्या शाळेत किती विद्यार्थी आहेत, याची पर्यवेक्षकीय यंत्रणेकडून प्रत्यक्ष पाहणी केली जात होती. मात्र आता शाळांनी सरल प्रणालीत भरलेल्या माहितीवरच विश्वास ठेवून संचमान्यता केली जात आहे. परिणामी, गेल्या दोन शैक्षणिक सत्रांतील संचमान्यतेत प्रचंड चुका झाल्या आहेत. संचालनालयाने शिक्षणाधिकाऱ्यांच्या लॉगीनवर उपलब्ध करून दिलेल्या संचमान्यतेवर हजारो शाळा असमाधानी आहेत. २०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन शैक्षणिक सत्रांतील संचमान्यता चुकीची असल्याचा उलगडा शिक्षण संचालनालयाला झाला आहे. आता विनाअनुदानित शाळांना २० टक्के वेतन अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश शासनाने दिले. मार्च एडिंगपूर्वी वेतनअनुदान वितरित करण्याचे निर्देश आहे. परंतु, संचमान्यता दुरुस्त केल्याशिवाय वेतन अनुदान देता येणे शक्यच नाही. आणि अनुदान वितरित केले नाही किंवा व्यपगत झाल्यास कारवाईचा बडगा संचालकांसह शिक्षणाधिकाऱ्यांवर उगारला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन परीक्षेच्या तोंडावर संचमान्यता दुरुस्तीचे शिबिर २७ फेब्रुवारीपासून पुण्यात घेण्यात येत आहे. यात पहिल्या दिवशी पुणे, अमरावती, २८ रोजी कोल्हापूर, नागपूर, २ मार्चला मुंबई, औरंगाबाद आणि ३ मार्चला नाशिक, लातूर विभागातील संचमान्यतांमध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी २०१२ ते २०१७ या पाच शैक्षणिक सत्रांतील विद्यार्थीसंख्या, मान्य पदे, पायाभूत पदे आदी माहिती घेऊन शिक्षणाधिकाऱ्यांना पुण्यात बोलावण्यात आले आहे. संचमान्यता करूनही गेल्या दोन वर्षांत विद्यार्थ्यांना योग्य प्रमाणात शिक्षक मिळाले नाही. यंदा संपूर्ण सत्र संपल्यानंतर ऐन परीक्षेच्या काळात एखाद्या शाळेला शिक्षक मिळाला तरी विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग काय, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. आता संचमान्येत दुरूस्ती कधी होते, याकडे लक्ष आहे.
शिक्षक संचमान्यतेचे गुऱ्हाळ सुरूच
By admin | Published: February 27, 2017 12:51 AM