नेर (यवतमाळ) : त्याला लहानपणापासून् चित्र काढायची आवड होती. मात्र, गुरुजींनी चित्र काढायला लावले तर तो मित्र किंवा आईकडून चित्र काढून शाळेत न्यायचा. सातवीत असताना गुरुजींनी त्याची ही चोरी पकडली. त्याला वर्गात बदडले. गुरुजींच्या त्या बदडण्याने त्याचे आयुष्यच बदलून गेले. तो स्वत: चित्र काढू लागला. आज त्याच्या कुंचल्यांची जादू थेट सातासमुद्रापार पोहोचली आहे.
प्रतीक विजय माकडे, असे त्या युवकाचे नाव आहे. तो तालुक्यातील मोझर येथील रहिवासी आहे. मात्र, सध्या त्याचे कुटुंब नेर येथेच वास्तव्याला आहे. त्याच्या कुंचल्यांची जादू थेट मोरोक्को, ब्राझील, अर्जेंटिना, अमेरिका, आदी देशात पोहोचली आहे. त्याने तालुक्याचे नाव जागतिक स्तरावर पोहोचविले आहे. कलेचा कोणताही वारसा नसताना श्रम व चिकाटीच्या जोरावर कमी वयात प्रतीकने आपला ठसा उमटविला आहे.
येथील इंग्लिश हायस्कूल व नंतर नेहरू महाविद्यालयात प्रतीकचे शिक्षण झाले. नंतर त्याने मुंबई येथील नामांकित जे.जे. आर्ट ऑफ स्कूल फाईनमध्ये प्रवेश घेतला. सध्या तो पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहेत. शिक्षणासोबतच तो पेंटिंग काढतो. त्याच्या एका पेंटिंगची आंतरराष्ट्रीय ऑनलाईन कला प्रदर्शनी मणिकर्णिका आर्ट गॅलरीद्वारे आयोजित कला प्रदर्शनात निवड झाली. या प्रदर्शनात उत्तर प्रदेशमधील कलावंत कामिनी बँगेल सहभागी होत्या.या स्पर्धेत आठ ते दहा देशांतील १८१ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात भारत, ब्राझील, अर्जेंटिना, कजाकिस्तान, युएसए, तुर्की, अझरबैजान, इजिप्त, रशिया, कोलंबिया, आदी देशातील स्पर्धकांचा सहभाग होता. त्याची पेंटिंग कॅनव्हास दिल्लीत प्रकाशित झाली. ओडिशा येथे झालेल्या आर्ट ॲण्ड आर्टिस्ट स्पर्धेत प्रतीकच्या पेंटिंगला सोळाव्या क्रमांकाचा मान मिळाला होता. विशेष म्हणजे हा मान सीनिअर कॅटेगिरीमध्ये मिळाला.
बालपणापासूनच प्रतीकला आवड
बालपणापासूनच प्रतीकला चित्रकलेची आवड होती. मात्र, त्याने चित्र कधी काढले नाही. आकृती किंवा ड्रॉइंग काढायची असल्यास तो आई किंवा मित्राकडून काढून घ्यायचा. सातव्या वर्गात असताना त्याची हीच चोरी पकडली गेली. त्यामुळे शिक्षकांनी त्याला बदडले. तेव्हापासून प्रतीकने चित्रकलेत स्वयंपूर्ण होण्याचा ध्यास घेतला. आता त्याचे चित्र थेट सातासमुद्रापार पोहोचले आहे. प्रतीकची आई ब्युटी पार्लरचा व्यवसाय करते, तर वडील कापड व्यवसाय करतात. सामान्य परिस्थितीतून प्रतीकने तालुक्याचा नावलौकिक वाढविला आहे.