यवतमाळ : शिक्षक म्हणून कार्यरत असताना नियमित बीएड करणे आणि त्या कालावधीचे वेतन उचलून शासनाची फसवणूक करणाऱ्या शिक्षक दाम्पत्याला निलंबित करण्यात आल्याची माहिती भारिप बहुजन महासंघाने प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली. नेर पंचायत समितींतर्गत मोझर येथील जिल्हा परिषद शाळेत पंडित वैद्य व कल्पना बोंद्रे हे शिक्षक दाम्पत्य कार्यरत होते. २०१३-१४ मध्ये त्यांनी नियमित बीएड केले. मात्र त्याच कालावधीतील तीन महिन्यांचे वेतनही त्यांनी उचलले. याबाबत भारिप बहुजन महासंघाचे सिद्धार्थ वाळके यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे ११ मे २०१५ रोजी निवेदन दिले होते. त्यानुसार विस्तार अधिकारी डी.जे. रामटेके यांनी प्रकरणाची चौकशी केली. १० जुलै २०१५ रोजी शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांच्याकडे चौकशी अहवाल दिला. या अहवालानंतर भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा प्रवक्ते पद्माकर घायवान यांनी प्रकरणाचा विभागीय आयुक्तांपर्यंत पाठपुरावा केला. त्यानंतर २१ जुलै २०१६ रोजी सदर शिक्षक पती-पत्नीला निलंबित करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी काढल्याची माहिती भारिप बहुजन महासंघाने दिली. (स्थानिक प्रतिनिधी)
‘ते’ शिक्षक दाम्पत्य अखेर निलंबित
By admin | Published: August 05, 2016 2:39 AM