अविनाश साबापुरे यवतमाळ : तीन वर्षांपूर्वी घोषित केलेली आणि वर्षभरापूर्वी प्रत्यक्ष पवित्र प्रणालीमार्फत सुरू झालेली शिक्षक भरती न्यायालयीन कचाट्यातून सुटल्यावरही कोरोनामुळे अडखळली होती. मात्र आता पुन्हा ही प्रक्रिया ‘अनलॉक’ झाली असून प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी शाळांचे प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा पोर्टलवर सुरू करण्यात आली आहे.गेल्या वर्षी ९ आॅगस्टला राज्य शासनाने पवित्र पोर्टलद्वारे मुलाखतीशिवाय नियुक्ती द्यावयाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. तर ५ सप्टेंबरला ऐन शिक्षक दिनी हजारो उमेदवारांना प्रत्यक्ष नियुक्तीपत्रेही प्रदान केले. मात्र त्यानंतर मुलाखतीसह नियुक्तीचा पर्याय निवडलेल्या उमेदवारांची निवड यादी प्रलंबित राहिली. त्यानंतर झालेला सत्ताबदल, न्यायालयीन प्रकरणे यामुळे पुढची प्रक्रिया रखडली होती. त्यातच कोरोना संकटामुळे वित्त विभागाने ४ मे रोजीच्या निर्णयानुसार भरती प्रक्रियेवर बंदी आणली.परंतु आता ठप्प पडलेल्या पवित्र पोर्टलला पुन्हा एकदा गती आली असून गुरुवारी उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी ३१ आॅगस्ट ही अखेरची मुदत देण्यात आली आहे.त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही शिक्षक दिनीच उमेदवारांना गोड बातमी कळण्याची दाट शक्यता आहे. रयत संकल्प डीएड, बीएड संघटनेचे राज्याध्यक्ष परमेश्वर इंगोले पाटील यांनीही याला दुजोरा दिला आहे.>कोणी भरावे प्राधान्यक्रमआता माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षक पदासाठी प्राधान्यक्रम देता येईल.ज्यांना यापूर्वी ५० टक्के पेक्षा कमी गुण असल्याने उच्च माध्यमिकचे प्राधान्यक्रम आले नव्हते, परंतु त्यांनी पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण केली, त्यांना प्राधान्यक्रम भरता येईल.तसेच माध्यमिक गटासाठी पदवीला ५० टक्के पेक्षा कमी गुण असल्याने ज्यांना प्राधान्यक्रम आले नव्हते, त्यांनाही आता मुलाखतीसह पदाचे प्राधान्यक्रम भरता येणार आहे.ज्यांनी यापूर्वीच मुलाखतीसह संस्थांचे प्राधान्यक्रम लॉक केले, त्यांना प्राधान्यक्रम देण्याची गरज नाही.>प्राथमिक शिक्षकांच्या १५६० जागा आता रिक्त आहेत. तर एकूण जाहीर केलेल्या १२ हजार १४० जागांपैकी पाच हजार ८२२ जागा अजून भरणे बाकी आहे.
शिक्षक भरतीसाठीची प्रक्रिया पुन्हा झाली सुरू!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 3:45 AM