विविध मागण्या : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणारयवतमाळ : विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी ऐन शिक्षक दिनी ५ सप्टेंबरला जिल्हा परिषद शिक्षक समन्वय कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे. यावेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन देऊन त्यांची पूर्तता लवकर करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येणार आहे. शिक्षकांच्या अनेक मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. त्यात शिक्षक कल्याण निधीची रक्कम तत्काळ परत करावी, कल्याण निधीच्या ८४ लाखांच्या नुकसानीस जबाबदार असलेल्यांविरूद्ध कारवाई करावी, बिंदुनामावली अद्ययावत करून मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी पदे पदोन्नतीने भरावी, विषय शिक्षकांची नियुक्ती करावी, आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतील प्रतीक्षेत असलेल्यांना नियुक्ती द्यावी, आदीवासी व नक्षलग्रस्त भागातील पात्र शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ द्यावा, सेवानिवृत्तांना निवड श्रेणीचा लाभ द्यावा, २0 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करू नये, आदी मागण्यांचा समावेश आहे.या सर्व मागण्यांसाठी ऐन शिक्षक दिनी ५ सप्टेंबरलाच शिक्षक समन्वय कृती समितीतर्फे हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात बहुतांश शिक्षक संघटनांचा सहभाग आहे. जिल्हा परिषदेच्या प्रांगणातून सकाळी १0.३0 वाजता हा मोर्चा निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन सर्व सहभागी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)
शिक्षकदिनीच शिक्षकांचा मोर्चा
By admin | Published: September 02, 2016 2:30 AM