यवतमाळ : घाटंजी तालुक्यातील शिक्षकाने एका मुलीला लग्नाचे आमिष दाखवत चार वर्ष शोषण केले. या गुन्ह्यात शिक्षकाला जिल्हा सत्र न्यायालयाने दहा वर्षे कारावास व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सोमवारी हा निकाल देण्यात आला. माधव संभूजी मरापे (३५) रा.केळापूर रेणापूर ता.घाटंजी असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. त्याने एका मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर सलग अत्याचार केला. या प्रकरणी मुलीने घाटंजी पोलीस ठाण्यात २०१५ मध्ये तक्रार दाखल केली.
पोलीस निरीक्षक आर.आर. येडमे यांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या खटल्यात एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडित मुलगी, साक्षीदार व तपास अधिकारी, परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य मानून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश टी.एस. अकाली यांनी आरोपीला ३७६ कलमामध्ये दहा वर्ष कारावास व ५० हजार रुपये दंड तसेच ४१७ कलमांमध्ये एक वर्ष कारावास व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. आरोपीला या सर्व शिक्षा एकाचवेळी भोगावयाच्या आहे. या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने सहायक सरकारी वकील नरेंद्र एन. पांडे यांनी बाजू मांडली. त्यांना पैरवी अधिकारी दादाराव गेडाम यांनी सहकार्य केले.