महागाव (यवतमाळ) : तालुक्यातील आमणी (खुर्द) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिकांमधील अंतर्गत बेबनाव व विसंवाद विकोपाला गेला. या वादात शिक्षिकेने विद्यार्थ्यांच्या हजेरी बुकाची पाने फाडली. एवढेच नाही, तर तीन दिवसांपासून हजेरी बुक गहाळ केले. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खोळंबा सुरू झाला. या वादाची वाच्यता गावभर झाल्यानंतर पालक व गावकऱ्यांनी शाळेवर धडक दिली.
संतप्त गावकऱ्यांनी शाळेतील चारही शिक्षिकांना शाळेत येण्यास प्रतिबंध घातला. पालकांनी शाळेचा ताबा घेतला. आता पालक आणि शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य शाळेच्या आवारात, तर चारही शिक्षिका शाळेच्या कंपाउंडबाहेर बसत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. शाळेतील चारपैकी एक शिक्षिका माजी आमदारांची पत्नी आहे, हे विशेष.
शिक्षिकांमध्ये काही कारणावरून कलह निर्माण झाला. त्यांच्या भांडणात हजेरी बुक फाडून गायब करण्यात आले. विद्यार्थ्यांनी हा प्रकार पालकांच्या कानी घातला. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी शाळेचा कारभार हाती घेतला. स्वयंसेवकांच्या साहाय्याने वर्ग सुरू ठेवून चारही शिक्षिकांना बाहेर बसविण्याचा निर्णय घेतला. आता स्वयंसेवक वर्गात, पालक शाळेच्या प्रांगणात आणि शिक्षिका शाळेबाहेर अशी अजब परिस्थिती निर्माण झाली आहे.बीईओंनी नेमली चौकशी समितीगावकऱ्यांनी घटनेची तक्रार शिक्षण विभागाकडे केली. नंतर गटशिक्षणाधिकारी मारोती मडावी यांनी चौकशी समिती नेमली. समितीत शिक्षण विस्तार अधिकारी रामकृष्ण बगाडे, गोपाल कटकमवार यांचा समावेश आहे. त्यांनी साेमवारी शाळेला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र, मुख्याध्यापिका चौकशी समितीसमोर आल्या नसल्याचे सांगण्यात आले.