लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीवर स्वीकृत सदस्य म्हणून आणखी एका शिक्षक नेत्याची निवड केली जाणार आहे. त्यासाठी सोमवारी सात शिक्षक नेत्यांच्या मुलाखती होणार आहे. मात्र तत्पूर्वीच या नेत्यांनी एकमेकांचा पत्ता कट करण्यासाठी चिखलफेक सुरू केली आहे.शिक्षण समितीवर दोन निमंत्रित सदस्य घेतले जातात. त्यापैकी मधुकर काठोळे यांची नियुक्ती यापूर्वीच झाली आहे. आता उर्वरित एका सदस्याकरिता मुलाखती होणार आहेत. त्यासाठी प्रशासनाने सात शिक्षक संघटनांच्या नेत्यांना मुलाखतीला बोलावले आहे. मात्र या नेत्यांनी स्वत:ची योग्यता सिद्ध करण्यात श्रम खर्ची घालण्याऐवजी आपल्या प्रतिस्पर्ध्याची लंगडी बाजू पुढे आणण्याचा अट्टहास सुरू केला आहे.सर्वाधिक सभासदांची नोंदणी असलेली संघटना, हा या निवडीसाठी सर्वात पहिला निकष आहे. त्यादृष्टीने सातही संघटनांमध्ये रस्सीखेच आहे. मात्र संबंधित शिक्षक नेत्यावर न्यायालयीन प्रकरण सुरू नसणे, खातेनिहाय चौकशी सुरू नसणे, शिस्तभंगाची कार्यवाही झालेली नसणे, गुन्हा दाखल झालेला नसणे हेही महत्त्वाचे निकष आहेत. नेमक्या याच मुद्द्यांवरून नेते एकमेकांविरुद्ध गरळ ओकत आहेत.स्पर्धेतील नेते पतसंस्थेच्या आर्थिक गैरव्यवहारात गुंतलेले आहे, अशी तक्रार मुळाव्यातील एका शिक्षकाने सीईओंकडे केली आहे. तर अन्य एका शिक्षक नेत्याने दारव्हा येथील पतसंस्थेचे निमित्त करून आपल्या प्रतिस्पर्ध्यावर शरसंधान साधले आहे. तर एका प्रतिस्पर्ध्यावर चक्क महिलेने जातीवाचक प्रकरणात गुन्हा नोंदविल्याची बाब बोलून दाखविली. एका नेत्याबाबत तर चक्क ते आपल्या संघटनेचे आता जिल्हाध्यक्षच नाहीत, असे सांगितले जात आहे. त्याचवेळी काही जणांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याचे चारित्र्य चांगले नसल्याचे सांगणे सुरू केले आहे.या सर्व चिखलफेकीमुळे शिक्षण समितीत निमंत्रित सदस्य म्हणून दाखल होणारा शिक्षक नेता शिक्षण क्षेत्राला कितपत न्याय देईल, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. या प्रकाराने शिक्षणप्रेमी नाराज आहे. या चिखलफेकीतील खरे खोटे काय, कोण धुतल्या तांदळाचे, ते प्रत्यक्ष सोमवारच्या मुलाखतीतून स्पष्ट होणार आहे.
शिक्षण समितीवरून शिक्षक नेत्यांची चिखलफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 9:58 PM
जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीवर स्वीकृत सदस्य म्हणून आणखी एका शिक्षक नेत्याची निवड केली जाणार आहे. त्यासाठी सोमवारी सात शिक्षक नेत्यांच्या मुलाखती होणार आहे. मात्र तत्पूर्वीच या नेत्यांनी एकमेकांचा पत्ता कट करण्यासाठी चिखलफेक सुरू केली आहे.
ठळक मुद्देजिल्हा परिषदेत उद्या होणार मुलाखती : सर्वाधिक सभासद कुणाचे?, कोण धुतल्या तांदळाचे?