लोकमत न्यूज नेटवर्कबिजोरा : पुसद पंचायत समितीच्या काटखेड शाळेत कार्यरत शिक्षकाने मानसिक छळातून महागाव तालुक्यातील बेलदरी येथे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी रात्री घडली. मृत्युपूर्वी शिक्षकाने सात पानाची चिठ्ठी लिहिली असून त्यात एका शिक्षक संघटनेच्या नेत्यासह मुख्याध्यापक आणि सहायक शिक्षकाचे नाव लिहिले आहे. या घटनेने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान वृत्तलिहिस्तोवर महागाव पोलीस ठाण्यात कुणावरही गुन्हा मात्र दाखल झाला नव्हता.मनोहर वसंत जाधव (३७) रा. बेलदरी असे मृत शिक्षकाचे नाव आहे. ते पुसद पंचायत समितीच्या काटखेड शाळेत विशेष शिक्षक म्हणून कार्यरत होते. रविवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास त्यांनी पत्नीला मोबाईल करून आपण आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. यामुळे घाबरलेल्या पत्नीने नातेवाईकांना माहिती दिली. त्यांचा शोध सुरू केला असता रात्री १० वाजताच्या सुमारास शेतातील विहिरीजवळ दुचाकी, मोबाईल आणि पाकीट आढळून आले. त्यावेळी विहिरीचे पाणी उपसून त्यांचा शोध घेण्यात आला. त्यावेळी मनोहरचे प्रेत आढळून आले. परंतु रात्र अधिक झाल्याने प्रेत बाहेर काढता आले नाही. दरम्यान या घटनेची रात्रीच माहिती महागाव पोलीस ठाण्यात देण्यात आली. सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास मनोहर जाधव यांचे प्रेत बाहेर काढण्यात आले. विहिरीजवळ ठेवलेल्या पाकिटात एक सात पानांची चिठ्ठी आढळून आली. ही चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली. या ठिकाणी परिसरातील नागरिकांची एकच गर्दी झाली होती. दरम्यान त्याच ठिकाणी शवविच्छेदन करून सायंकाळी उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. शिक्षक मनोहरच्या मागे पत्नी वर्षा, मुलगा, मुलगी, आई-वडील असा परिवार आहे.दरम्यान महागाव पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे. घटनास्थळाला उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, महागावचे ठाणेदार दोनकलवार यांनी भेट दिली.शिक्षक मनोहर जाधव यांनी सात पानाची चिठ्ठी लिहिली आहे. त्यात एका शिक्षक संघटनेच्या नेत्यासह मुख्याध्यापक आणि सहायक शिक्षकाचे नाव स्पष्टपणे नमूद केले आहे. या तिघांच्या मानसिक छळामुळे आपले जगणे असह्य झाले आहे. त्यामुळेच आपण आत्महत्या करीत असल्याचे या चिठ्ठीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळपर्यंत कुणावरही गुन्हा दाखल झाला नव्हता. ठाणेदार दोनकलवार यांच्याशी संपर्क साधला असता, या प्रकरणी कुणाचीही अद्याप तक्रार प्राप्त झाली नाही. रात्री मिळालेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.पत्नीच्या नावाने हृदयस्पर्शी चिठ्ठीशिक्षक मनोहर जाधव यांनी आपल्या पत्नी वर्षाच्या नावे एक हृदयस्पर्शी चिठ्ठी लिहिली आहे. या चिठ्ठीत त्यांनी तिला जीवनभर साथ देऊ शकलो नाही, याची खंत व्यक्त केली. ‘हे कलियुग आहे, या युगात चोर सोडून संन्याशालाच फाशी मिळणार आहे’ असे लिहिले आहे. स्वत:चे जीवन ईश्वराला समर्पित करून जीवन जगण्याचा सल्ला देत सर्वांना सांभाळण्यासही त्यांनी सांगितले आहे. ईश्वराच्या न्यायालयात या लोकांना जरुर शिक्षा मिळेल, कारण तेथे पैसा, राजकीय दाट संबंध चालत नाही, असेही म्हटले आहे.
छळातून शिक्षकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 10:45 PM
पुसद पंचायत समितीच्या काटखेड शाळेत कार्यरत शिक्षकाने मानसिक छळातून महागाव तालुक्यातील बेलदरी येथे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी रात्री घडली. मृत्युपूर्वी शिक्षकाने सात पानाची चिठ्ठी लिहिली असून त्यात एका शिक्षक संघटनेच्या नेत्यासह मुख्याध्यापक आणि सहायक शिक्षकाचे नाव लिहिले आहे.
ठळक मुद्देबेलदरीची घटना : सात पानी चिठ्ठीत शिक्षक नेत्यासह, मुख्याध्यापकाचे नाव