लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील ८१ शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या शाळा बंद करू नये यासाठी यवतमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने मंत्रालय गाठून ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा केली. संघाचे अध्यक्ष राजुदास जाधव यांच्या मार्गदर्शनात शिष्टमंडळाने आपली बाजू मांडली.शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार २० हून कमी पटसंख्या असलेल्या तसेच एक किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर असलेल्या शाळा बंद करण्यासाठी राज्यभरातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात राज्यातील पाच हजार दोन शाळांमध्ये दहापेक्षा कमी पटसंख्या दिसून आली. यात चार हजार ३५३ शाळा जिल्हा परिषदेच्या आहेत. शिक्षकांची संख्या आठ हजार ७२ आहे. ६९ शाळा खासगी अनुदानित तर त्यावरील शिक्षक संख्या २२० आहे. या सर्व शाळांमध्ये २८ हजार ४१२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थी आणि शिक्षकांना जवळच्या शाळेत समायोजित केले जाणार आहे. यामुळे पाच हजार दोन शाळा भविष्यात बंद होणार आहे. गतवर्षी एक हजार ३१४ शाळा शासनाने बंद केल्या आहे.यवतमाळ जिल्ह्यातील ८१ शाळा बंद करून स्थलांतरित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या शाळांमध्ये विद्यार्थी काही कमी पटसंख्येच्या व काही १०० पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शाळा आहेत. जास्त पटसंख्येच्या शाळा बंद का केल्या जात आहे, हा प्रश्न मात्र कायम आहे.जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने ना. पंकजा मुंडे यांच्याकडे यवतमाळ जिल्ह्यातील ८१ शाळा बंद करू नये, अशी विनंती केली. शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांच्याशी ना. पंकजा मुंडे यांनी चर्चा करून ८१ शाळा पूर्ववत सुरू ठेवण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे शिक्षक संघाने म्हटले आहे. या शिष्टमंडळात आसाराम चव्हाण, भास्कर डहाके, दत्ता राठोड, ईश्वर चव्हाण, विठ्ठल जाधव, शमशुद्दिन भाटी, पवन राऊत, नितीन मेश्राम आदींचा समावेश होता.
८१ शाळांसाठी शिक्षक संघाची मंत्रालयात धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 10:15 PM