- अविनाश साबापुरेयवतमाळ : शिक्षकांच्या नियुक्तीप्रमाणे त्यांच्या बढतीसाठीही ‘टीईटी’ उत्तीर्णतेची अट सक्तीचीच असल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेने (एनसीटीई) जारी केले आहे. त्यामुळे बढतीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो पदवीधर शिक्षकांनाही दणका बसला आहे.
जून-जुलैदरम्यान शिक्षकांच्या पदोन्नतीसाठीही ‘टीईटी’ची अट लागू असल्याचे शिक्षण संचालकांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना सांगितले होते. त्यामुळे शिक्षकांचा बढतीचा मार्ग बंद झाला होता. याबाबत ‘लोकमत’ने १६ जुलैच्या अंकात वृत्त प्रकाशित केल्यानंतर सर्वच शिक्षक संघटना खडबडून जाग्या झाल्या होत्या. याविरोधात पाठपुरावा वाढल्यानंतर राज्य शासनानेही २०१३ नंतर नियुक्त शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी ‘टीईटी’ आवश्यक असल्याचा ‘जीआर’ निर्गमित केला होता; परंतु आता ‘एनसीटीई’ने तामिळनाडू सरकारला दिलेल्या निर्देशानुसार, २०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या पदोन्नतीसाठीही ‘टीईटी’ची अट लागू असल्याचे म्हटले आहे.
‘एनसीटीई’चे आदेश- शिक्षकांच्या बढतीसंदर्भात मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यावर ११ सप्टेंबर रोजी ‘एनसीटीई’ने दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, पहिली ते आठवीच्या वर्गावर नियुक्तीसाठी शिक्षकांकडे ‘टीईटी’ असणे ही किमान पात्रता आहे. हा अधिनियम शिक्षकांची पदोन्नती करतानाही त्यांच्या मूळ नियुक्तीची तारीख लक्षात न घेता लागू केला जाईल. २३ ऑगस्ट २०१० पूर्वी नियुक्ती मिळालेल्या शिक्षकांसह देशातील सर्वच प्रकरणांना सारख्याच पद्धतीने हे स्पष्टीकरण लागू असेल.