वणी (यवतमाळ) : वणी तालुक्यातील कायरलगत असलेल्या चेंडकापूर गावात एकाच दिवशी १५ जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यासाठी आरोग्य पथक चेंडकापुरात पोहोचले खरे, परंतु कोरोनाबाधित रूग्णांनी उपचार घेण्यासाठी येण्यास नकार देत चांगलाच राडा केला. यावेळी आरोग्य पथक व पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये चांगलीच वादावादी झाली.
गावात काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले होते. विनंत्या करूनही हे रूग्ण उपचारासाठी येण्यास नकार देत होते. त्यामुळे अखेर शिरपूरचे ठाणेदार सचिन लुले, वणीचे तहसीलदार विवेक पांडे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विकास कांबळे हे आपल्या ताफ्यासह चेंडकापुरात दाखल झाले. या अधिकाऱ्यांनीही या रूग्णांना उपचारासाठी रूग्णालयात चालण्याची विनंती केली. परंतु, तरीही हे रूग्ण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर गावातीलच शाळेत या रूग्णांना ठेऊन तेथेच त्यांच्यावर उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर वातावरण शांत झाले.