लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्ह्यामध्ये जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने जोरदार बॅटींग केली. शंभर मिमीपेक्षा अधिक पाऊस पहिल्याच आठवड्यात बरसला. काही मंडळात अतिवृष्टी झाली. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करत सुरुवात केली. मात्र नंतरच्या काळात पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरविली. आता काही भागात पाऊस पडला तर बहुतांश भागात पाऊसच नाही अशी भयावह स्थिती आहे. यामुळे दुबार पेरणीचे संकट जिल्ह्यावर घोंगावत आहे. जिल्ह्याच्या एकूण भूभागापैकी आठ लाख तीन हजार ७८४ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. पेरणी करताना काही नियम आहेत. ३० जूनपूर्वी कपाशीची लागवड करायची असते. तर १५ जुलैपर्यंत सोयाबीनची पेरणी करता येते. पेरणीचा कालावधी जितका लांबेल तितके उत्पादन घटते. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहे. शेतकऱ्यांनी बियाणे शेतशिवारात पेरले आहे. त्यातील काही बियाणे उगवले तर काही बियाणे दडपले आहे. काही बियाणे भेसळयुक्त असण्याची शक्यता आहे. यातून शेतकऱ्यांना पाऊस आल्यानंतर दुबार पेरणी करावी लागणार अशी स्थिती आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात ७ तारखेपासून पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मात्र आलेले ढग बरसल्याशिवाय खरे नाही. अशीच परिस्थिती यावर्षी शेतकऱ्यांना पाहायला मिळत आहे.
...तर दुबार पेरणी दिवसाचे तापमान ३८ ते ४० अंशाच्या जवळ पोहोचत आहे. या कडक उन्हात कोवळे अंकुरलेले बीज टिकणार की नाही अशी परिस्थिती आहे. वातावरण आणखीन असेच राहिले तर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. याशिवाय पावसात खंड पडल्याने कीडीचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. दुबार पेरणी करायची झाली तर पैसे नाही.
जिल्ह्यात बहुतांश भागात पेरणी आटोपली आहे. शेतकऱ्यांचा सर्वाधिक कल कपाशीकडे दिसत आहे. काही भागामध्ये पावसाचा खंड आहे. यातून पेरण्याही प्रभावित झाल्या आहे. येत्या काही दिवसात पाऊस येण्याचा अंदाज आहे. यातून परिस्थिती सुधारेल. शेतकऱ्यांनी बियाण्यांची खात्री करूनच बियाणे खरेदी करावे. - राजेंद्र माळोदे, कृषी विकास अधिकारी
देव अशी परीक्षा दरवर्षी का घेतो
शेतशिवारात पेरणी झाली आहे. सोयाबीन, कपाशी आणि तुरीची लागवड झाली आहे. पहिल्या पावसात कपाशीचे बियाणे निघालेच नाही. यामुळे दुबार टोबणी केली. त्याच्यावर पाहिजे तसा पाऊस झाला नाही. यामुळे कपाशी लागवड प्रभावीत झाली आहे. याचा शेतीच्या उत्पन्नाला फटका बसणार आहे. - अविनाश राऊत, शेतकरी
बेंबळाचे बॅक वाॅटर आमच्या शेतशिवारात दरवर्षी येते. यावर्षी पाणी दूर असले तरी लागवड केलेली कपाशी पाहिजे तशी आली नाही. आता कपाशी काढून सोयाबीन पेरण्याची वेळ आहे. मात्र बाजारात सोयाबीनच उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत शेती करायची तरी कशी असा प्रश्न पडला आहे. हवान विभाग दर वेळेस पाऊस येते असे सांगते. मात्र पावसाचा पत्ता नाही. - शैलेश जयस्वाल, शेतकरी
सोयाबीन पेरा अडीच लाखांवर थांबला गुलाबी बोंडअळीची दहशत पाहता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीकडे आपला मोर्चा वळविला होता. मात्र सोयाबीनचे बियाणेच उपलब्ध झाले नाही. यामुळे जिल्ह्यातील सोयाबीनचे पेरा क्षेत्र अडीच लाख हेक्टरपर्यंतच मर्यादित राहिले.