गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : दारू, ग्रामपंचायतीचे राजकारण, हेवेदावे, शेजारचे वाद, कौटुंबिक कलह यातून दररोज पोलीस ठाण्यात तक्रारी होतात, गुन्हे नोंदविले जातात. परंतु गेल्या दहा वर्षात गावातील कुणीही पोलीस ठाण्याची पायरी चढले नाही, असे सांगितल्यास कुणालाही सहज खरे वाटणार नाही. परंतु हे वास्तव आहे. यवतमाळ तालुक्यातील शिवणी या आदर्श गावात हा चमत्कार घडला आहे. या गावाला प्रत्यक्ष भेट दिली असता संपूर्ण गावाचीच अनोखी कहानी पुढे आली.कळंब तालुक्याला लागूनच असलेले यवतमाळ तालुक्यातील शिवणी (बु) हे गाव चारही बाजूंनी डोंगरमाळांनी वेढलेले. केवळ ६७६ लोकसंख्या असलेल्या या गावातून मागील १८ वर्षांपूर्वीच दारुला हद्दपार करण्यात आले. गावात एकही पानठेला नाही. पाच वर्षांपासून गाव प्लॉस्टीकमुक्त करण्यात आले. या गावाने स्वच्छतेला दैवत मानले, म्हणून कुठेही कचरा दिसून येत नाही. विशेष म्हणजे गावातील प्रत्येक सदस्य स्वच्छता मोहिमेत सहभागी होतोच. प्रत्येक रविवार पुरुष, गुरुवार महिला तर शनिवारला मुले स्वच्छता अभियान राबवितात. गावातील प्रत्येक घरासमोर वैयक्तिक कचराकुंडी आहे.याठिकाणी श्रमदानातून ग्रंथालय उभारले आहे. दर सोमवारी गावकरी एकत्र येतात. पुढील आठवड्यात करावयाच्या कामाचे नियोजन केले जाते. लोकसहभागातून शाळा डिजीटल करण्यात आली. गावात गांढुळ खताचे चाळीस युनीट सुुरु आहे. प्रत्येक घरात परसबाग फुलविली आहे. उन्हाळा सोडला तर कोणीही बाजारातून भाजीपाला विकत आणत नाहीत. या गावात आर्थिक सुबत्ता असल्याची जाणीव आपसूकच होते. टप्याटप्याने परिसरातील शेती ८० टक्के रसायनमुक्त करण्यात आली आहे. मागील दहा वर्षापासून कोणीही पोलीस ठाण्याची पायरी चढलेला नाही. चौकाचौकात महापुरुषांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहे.तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा नंदुरबारचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी या गावाला नजीकच्या काळात दिशा दिली आहे. हे गाव उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे यांनी दत्तक घेतले आहे. येथील सर्व शेतकऱ्यांनी माती परिक्षण केले आहे. शेतात कोणीही पटपाणी देत नाही तर ड्रिप व स्प्रिंकलरने पाणी दिले जाते. यामाध्यमातून पाणी बचतीचा उद्देश सफल केला जातो. गावातील एकानेही आत्महत्या केलेली नाही. या गावातील विकासात सरपंच सरिता शिवणकर, उपसरपंच प्रमोद जीवतोडे, शेतकरी समितीचे अध्यक्ष मधुकर प्रधान, पोलीस पाटील विकास बोरकर, संजय हातगावकर, पुरुषोत्तम हटवार, पुष्पा कोहरे, पुरुषोत्तम मानकर, कृषी सहायक नासीर अली, तलाठी आशिष पानचौरे, रिलायंस फाऊंडेशनच्या रुपा भांदकर यांचा सहभाग आहे.गावाचा वाढदिवस साजरा होतोफेब्रुवारी महिन्यात गावाचा वाढदिवस साजरा केला जातो. संपूर्ण गावाला जेवण दिले जाते. गावच्या विकासात योगदान देणाºयांचे आभार मानले जातात. दोन ज्येष्ठ पुरुष व महिलाचे पाय धुवून त्यांचा चरणस्पर्श केला जातो. गावात या दिवशी तर चक्क दीपोत्सव साजरा होतो. सोबतच वर्षभरातील कामे व आठवणींना उजाळा दिला जातो.राज्यस्तरावर येण्यासाठी धडपडवॉटर कप स्पर्धेत शिवणीचा सहभाग आहे. या गावात जदलगतीने अतिशय देखणे करण्याचे काम सुरु आहे. सर्वच नागरिक सकाळ संध्याकाळ घाम गाळत आहे. लाखो लिटर पाणी साचविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. राज्यस्तरावर येणाºया प्रयत्नात येथील गावकºयांनी झोकून दिले आहे.लेकीचं झाड, माहेरची आठवणलग्न झालेल्या मुलीकडून सासरी जाताना तिच्या हातून वृक्ष लावले जाते. या वृक्षाला तिचे नाव दिले जाते. गावातील लोक तिच्या आठवणीत या झाडाचे संगोपन करतात. लेकीचं झाड, माहेरची आठवण हा उपक्रम गावकºयांसाठी जिव्हाळ्याचा ठरला आहे.
दहा वर्षात कुणीही पोलीस ठाण्याची पायरी चढले नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 10:17 PM
दारू, ग्रामपंचायतीचे राजकारण, हेवेदावे, शेजारचे वाद, कौटुंबिक कलह यातून दररोज पोलीस ठाण्यात तक्रारी होतात, गुन्हे नोंदविले जातात. परंतु गेल्या दहा वर्षात गावातील कुणीही पोलीस ठाण्याची पायरी चढले नाही, असे सांगितल्यास कुणालाही सहज खरे वाटणार नाही.
ठळक मुद्देआदर्श गाव शिवणीची अनोखी कहाणी : १८ वर्षांपासून दारू हद्दपार, गावात एकही पानठेला नाही, स्वच्छता हेच दैवत