पांढरकवडाचा प्रकार : एकुलत्या एक मुलाचेही झाले निधन, अख्खे कुटुंबच पडले उघड्यावरपांढरकवडा : कुटुंबाच्या पालन पोषणासाठी अनुकंपा पेन्शन मिळावे, यासाठी गेल्या १० वर्षांपासून एका पोलिसाची विधवा दारोदार भटकत आहे. अद्याप त्यांना पेन्शन मिळाली नाही. या दरम्यान त्यांच्या मुलाचाही मृत्यू झाला. त्यामुळे विधवा सून, नातवंडासह आत्महत्या करून जीवन संपवून टाकावे की काय, असा विचार मनात येत असल्याचे त्यांनी सांगितले.येथील इंदिरानगरमधील बेघर वसाहतीत प्रभाग क्रमांक सहामध्ये यमुनाबाई किसन उजवणे ही पोलीस कर्मचाऱ्याची विधवा, त्यांची विधवा सून सुनिता, नातू कार्तिक व सूर्यकांत, नात पौर्णिमा यांच्यासह वास्तव्याला आहे. यमुनाबाईचे पती किसन (बक्कल नं.४५९) कर्तव्यावर असताना एका प्रकरणात निलंबित झाले होते. त्यानंतर त्यांना परत बोलविण्यात आले. तथापि, सेवा पूर्ण होण्यापूर्वीच २४ आॅक्टोबर २००५ रोजी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तेव्हापासून त्यांची विधवा यमुनाबाई आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी अनुकंपा पेन्शन मिळावी म्हणून प्रयत्नरत आहे.त्यांनी पोलीस अधीक्षकांपासून, महासंचालक, गृहमंत्रालयापर्यंत अर्ज, विनंत्या केल्या. परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. पतीचा मृत्यू होऊन १० वर्षे लोटूनही पेन्शन न मिळाल्यामुळे या कुटुंबाची उपासमार होत आहे. पतीच्या मृत्यूनंतर कुटुंबाचे कसेबसे पालनपोषण करणारा त्यांचा एकुलता एक तरूण मुलगा गजानन याचासुद्धा दुर्दैवी मृत्यू झाला. तेव्हापासून त्याची पत्नी, आई व तीन मुले अनाथ झाली. मुलांचे पालनपोषण, त्यांचे शिक्षण करणे अशक्य झाले. यमुनाबाई भांडी घासण्याचे काम करून कसेबसे जीवन व्यतीत करीत असून कुटुंबाचा गाडा हाकलतात. याबाबत त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अवगत केले. मात्र अद्याप कुणीही गंभीर दखल घेतली नाही. विशेष म्हणजे यमुनाबाईचे पती किसन यांच्यासोबत असलेले दोन पोलीस बक्कल नं. ४७४ व २१९ हे पण निलंबित झाले होते. तथापि, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीला पेन्शन मिळत आहे. मात्र यमुनाबाईच्या पतीची हक्काची पेन्शन तिला का मिळत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
हक्काच्या पेन्शनसाठी १० वर्षांपासून पोलिसाच्या विधवेची भटकंती
By admin | Published: February 07, 2016 12:39 AM