यवतमाळ : बारावीचे परीक्षा केंद्र असलेल्या येथील काटेबाई शाळेची वीज थकीत बिलासाठी विद्युत कंपनीने कापली. या बाबीमुळे संतप्त झालेल्या पालकांनी सोमवारी वीज कंपनीविरुध्द आपला रोष व्यक्त केला. शाळेने वीज बिलापोटी धनादेश दिल्यानंतरही मीटर काढून नेण्यात आल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले.येथील काटेबाईची शाळा आणि गव्हर्नमेंट हायस्कूलकडे बिलापोटी ६४ हजार रुपयांची रक्कम थकीत झाली होती. यापोटीचा संयुक्त धनादेश शिक्षण विभागाने वीज कंपनीला दिला. धनादेश दिल्यानंतरही कंपनीने वीज बिलाची रक्कम खात्यात जमा झाल्यानंतरच वीज पुरवठा सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात आले.काटेबाई शाळा केंद्रावर परीक्षा सुरू झाल्यानंतरही वीज पुरवठा सुरू झाला नाही. परिणामी सोमवारी इंग्रजीच्या पेपरला विद्यार्थ्यांना अंधारात पेपर सोडवावा लागला. यातून पालकांनी परीक्षा केंद्राबाहेर प्रचंड संताप व्यक्त केला. यामुळे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. याठिकाणी असलेल्या मुख्याध्यापकांना पालकांनी जाब विचारला. यानंतर दूरध्वनीवरून वीज कंपनीचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब जाधव यांच्याशी संपर्क साधण्यात आला. यावेळी पालकांनी जाधव यांच्यावर प्रचंड नाराजी व्यक्त केली. प्रकरण चिघळण्याची शक्यता असल्याने वीज कंपनीने त्या घाईत परीक्षा केंद्रावर कर्मचारी पाठवून नवे मीटर बसवून वीज पुरवठा सुरू केला.यावेळी शिवसेनेचे संतोष ढवळे, पराग पिंगळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. पालकमंत्री संजय राठोड यांच्या कानावर हा प्रकार टाकण्यात आला. शिवसैनिकांनी पर्यवेक्षक आणि मुख्याध्यापकांना या प्रकरणात चांगलेच धारेवर धरले. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रश्न सोडविला. (शहर वार्ताहर)अविश्वासाची परिसीमाधनादेश वटून रक्कम वीज कंपनीच्या खात्यात जमा झाल्याशिवाय वीज पुरवठा सुरळीत केला जाणार नाही, अशी भूमिका विद्युत कंपनीने घेतली. वास्तविक बिलापोटीचा धनादेश शिक्षण विभागाने दिला होता. तरीही वीज कंपनीने शंका व्यक्त करून वीज पुरवठा कापला. दोनही यंत्रणा शासकीय आहेत. तरीही विश्वास ठेवला गेला नाही. यावरून ही अविश्वासाची परिसीमा झाली, असे मत अनेकांनी यावेळी मांडले.
परीक्षा केंद्राची वीज कापल्याने तणाव
By admin | Published: February 24, 2015 12:52 AM