दारव्हा (यवतमाळ) : शहरातील एका धार्मिक स्थळासमोर एका वेडसर युवकाने नारेबाजी केल्याने दुसऱ्या समाजातील युवक संतप्त झाले. यामुळे शहरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु पोलीसांनी वेळीच दखल घेत संबंधित युवकाला ताब्यात घेतले. तसेच अतिरिक्त पोलीस कुमक बोलावून तगडा बंदोबस्त लावल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
रमजान महिना शांततेत पार पडला. शनीवारला ईद असल्याने सकाळची नमाज झाली. त्यानंतर साडेदहा वाजता एक २५ वर्षाचा वेडसर युवक धार्मिक स्थळा जवळ आला. त्याने विचित्र हावभाव करीत नारेबाजी केली. तसेच बंद दुकानासमोरील लाकडी टेबल जमीनीवर आपटला. त्याच्या या कृत्यामुळे दुसऱ्या समाजातील युवकांना भावना दुखावल्याचे वाटले. त्यामुळे त्यांनी आजुबाजुच्या गल्लीत नारेबाजी केली. या घटनेमुळे तणावाची स्थिती निर्माण झाली. ही वार्ता पसरल्यानंतर काही भागातील व्यापारी प्रतिष्ठाने बंद करण्यात आली.
परिस्थीतीचे गांभीर्य लक्षात घेता ठाणेदार सुरेश मस्के यांच्यासह स्थानिक पोलीस अधिकारी,कर्मचाऱ्यांनी तातडीने त्या युवकाला ताब्यात घेतले. तसेच अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप,उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर घटनास्थळी दाखल झाले. दंगल नियंत्रक पथक,नेर,दिग्रस, लाडखेड येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाचरण करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. सध्या तरी शहरातील परिस्थिती नियंत्रणात असून उत्सव शांततेत साजरा करण्यात आला.
शांतता राखण्याचे आवाहन शहरात शांतता राखावी,पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोड व उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. दोषी व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले.तो वेडा असून वेडसरपणातून हे कृत्य केले. त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जात आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये. समाज माध्यमांवर खोटी माहिती प्रसारित करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.असा इशारा पञकात देण्यात आला आहे.