लाेकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दैनंदिन बसफेऱ्याच चालविण्यासाठी एसटी महामंडळाकडे चालक, वाहकांचा तुटवडा आहे. नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. सायंकाळी ६ वाजेनंतर बसेस मार्गावर सोडण्याचा प्रश्न आहे. असे असतानाच दहावी, बारावीच्या परीक्षार्थींची गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करा, अशा सूचना महामंडळाच्या वाहतूक महाव्यवस्थापकांनी विभाग नियंत्रकांना केल्या आहेत. दहावी आणि बारावीची परीक्षा मार्च व एप्रिल या दोन महिन्यांच्या कालावधीत होणार आहे. प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षेला सुरुवातही झाली आहे. या काळात विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी मोठी सर्कस करावी लागत आहे. गावातून बस नसल्याने खासगी अथवा वैयक्तिक वाहनाने परीक्षा केंद्र जवळ करावे लागत आहे. हीच परिस्थिती लेखी परीक्षा सुरू झाल्यानंतर होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. संप सुरू होण्यापूर्वी विविध मार्गांवर विद्यार्थ्यांसाठी मानव विकास मिशनच्या ४५, तर इतर ६५ बसेसची व्यवस्था होती.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे सचिवांनी एसटीच्या महाव्यवस्थापकांना पत्र दिले आहे. त्यानुसार महाव्यवस्थापकांनी विभाग नियंत्रकांना पत्र पाठविले आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र व उपकेंद्रावर जाण्या-येण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी मागणी व आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांना बसेस उपलब्ध करून द्याव्यात, असे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. दैनंदिन फेऱ्या सोडण्यासाठीच कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. मागणीनुसार फेऱ्या वाढवायच्या कशा, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांशी संपर्क केला जात आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार नियाेजन केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दररोज धावतात फक्त ८५ बसेस मार्गावरमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागातील सर्व आगारातून दररोज केवळ ८० ते ८५ बसेसच्या माध्यमातून वाहतूक केली जात आहे. त्यातही उमरखेड, दिग्रस आगारातून अनुक्रमे एक आणि चार बसेस धावत आहेत. २५ फेब्रुवारी रोजी ८१ बसफेऱ्या सोडण्यात आल्या. १६२ फेऱ्या करून चार हजार १८३ प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. दैनंदिन वाहतुकीची ही परिस्थिती असताना, परीक्षा काळातील वाहतुकीचे आव्हान महामंडळापुढे आहे.
हात दाखविल्यास गाडी थांबवा- राज्य मंडळाच्या सचिवांनी एसटीच्या महाव्यवस्थापकांना पाठविलेल्या पत्रात, विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेशपत्र ग्राह्य धरून प्रवासाची मुभा द्यावी, असे सूचित केले आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शाळेचे गाव ते परीक्षा केंद्र व उपकेंद्र यासाठी विशेष गाड्या गरजेनुसार सोडाव्यात, वेळापत्रकाला अनुसरून जाण्या-येण्यासाठी सोयीचे होईल असा बदल करावा, विद्यार्थी मार्गावर दिसल्यास आणि त्याने बस थांबविण्याची विनंती केल्यास जागा करून द्यावी, आदी सूचना शिक्षण मंडळ सचिवांनी केल्या आहेत.
मुख्याध्यापकांनी भेटावे- विद्यार्थ्यांची गैरसोय होवू नये, यासाठी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी बसफेरीच्या दृष्टीने आगार व्यवस्थापकांशी संपर्क करावा. त्यादृष्टीने नियोजन करता येईल, असे विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी सांगितले.