यवतमाळ : तालुक्यातील मंगरूळ येथे डेक्कन शुगर फॅक्टरी मध्ये रविवारी एका ऊसतोड कामगार युवकाच्या मृत्यने सायंकाळी तणावाची स्थिती निर्माण झाली. या प्रकरणात यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविण्याची तयारी चालविली आहे. कारखान्याच्या चौकीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे.
प्रकरण असे की, मंगरूळ परिसरात ऊसतोड कामगार मोठ्या संख्येने आले आहेत, तेथेच त्यांच्या राहुट्या आहेत. शनिवारी ऊसतोड कामगारांपैकीच एक जण दारूच्या नशेत कारखान्यात घुसण्याचा प्रयत्न करीत होता, त्याला चौकीदाराने रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र तो जुमानत नसल्याने चौकीदाराने त्यांला थापड मारली, यात तो नशेत असल्याने खाली पडून डोक्याला मार लागल्याने जखमी झाला. त्याला यवतमाळ येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले, मात्र आज दुपारी त्याचा मृत्यू झाला, त्यामुळे त्याच्या नातेवाईक आणि इतर ऊसतोड कामगारांनी कारखाना परिसरात प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे तेथे तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
पोलिसांना पाचारण करण्यात आले. मात्र तणाव कायम असल्याचे सांगण्यात आले. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. हा तणाव सोमवारीही कायम राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.