पांढरकवडा (यवतमाळ) : पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांमध्ये दहशत माजविणारा विकेश ऊर्फ विक्की विठ्ठलराव देशट्टीवार (वय ४१, रा. रामदेवबाबा ले-आउट पांढरकवडा) याला पांढरकवडा शहरासह यवतमाळ जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. आगामी काळात विविध सण-उत्सव, मिरवणुका व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये व शहरात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राहण्याच्या दृष्टीने सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. विकेश ऊर्फ विक्की विठ्ठलराव देशट्टीवार याच्या गुन्हेगारीचा अभिलेख २०१३ सालापासून आहे.
त्याच्याविरुद्ध पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात लोकसेवकांवर हल्ला करणे, शासकीय कार्यालयामध्ये जाऊन हल्ला करणे, शांतता भंग करणे, शासकीय कामकाजामध्ये अडथळा निर्माण करणे, शासकीय वस्तू चोरी करणे, दंगली करणे, दंगलीमध्ये सहभागी होऊन शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, अपंग सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांना धमकाविणे, सामान्य नागरिकांना मारहाण करणे, सार्वजनिक ठिकाणी शिविगाळ करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, दुखापत करणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद होते. त्याने पांढरकवडा शहर व परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. त्याच्याविरूद्ध करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाईला तो जुमानत नव्हता.
त्यामुळे पांढरकवडा येथील ठाणेदारांनी त्याला महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधिक्षकांमार्फत सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी केळापूर यांच्याकडे सादर केला होता. विकेश ऊर्फ विक्की विठ्ठलराव देशट्टीवार याचा गुन्हेगारी अभिलेख पडताळून पाहण्यात आला. वारंवार विघातक कृत्ये करून लोकांच्या जिवितास, मालमत्तेस व सामाजिक स्वास्थास धोका निर्माण केल्याने व त्याची गुन्हे करण्याची प्रवृत्ती वाढत चालल्याने त्याला दोन वर्षासाठी यवतमाळ जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश २९ ऑगस्टला पारीत करण्यात आले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पियूष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजणे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने, पोलीस निरीक्षक अमोल माळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण लिंगाडे, राजु बेलेवार, पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके, बालाजी ठाकरे, राम पोपळघट यांनी पार पाडली.