अविनाश साबापुरे
यवतमाळ : राज्यातील दहा हजारांवर उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षेची (टीईटी) बनावट प्रमाणपत्रे मिळविल्याचा गंभीर घोटाळा मागील वर्षी उघडकीस आला. त्यावर आता कायमस्वरुपी उपाय करण्यासाठी परीक्षा परिषदेने आता सर्व परीक्षार्थ्यांना केवळ ‘डिजिटल’ प्रमाणपत्रच देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रमाणपत्रांवर दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीला ते खरे की खोटे हे पडताळून पाहता येणार आहे. शिवाय, ही सर्वच्या सर्व प्रमाणपत्रे परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर सर्वांनाच पाहण्यासाठी उपलब्ध राहणार आहेत.
विशेष म्हणजे १ जुलैपासूनच या नव्या निर्णयाच्या अमलबजावणीला परीक्षा परिषदेतर्फे प्रारंभही करण्यात आला आहे. २०१८ आणि २०१९ या सलग दोन वर्षातील टीईटी परीक्षेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला. या दोन्ही परीक्षा मिळून दहा हजारांवर बोगस प्रमाणपत्रे दिली गेल्याची आकडेवारी पुणे पोलिसांनी शोधून काढली. त्यानंतर परिषदेला सर्वच उमेदवारांची प्रमाणपत्रे परत बोलावून त्यांची पडताळणी करावी लागली. त्यानंतर बोगस प्रमाणपत्रधारकांची टीईटीतील संपादणूक रद्द करीत त्यांना पुढील सर्व परीक्षांसाठी अपात्र ठरविले गेले. परंतु, टीईटीसोबतच आरोग्य विभागाची भरती परीक्षा, पोलिस विभागाची भरती परीक्षा यातही घोटाळे पुढे आले. त्यामुळे बोगस प्रमाणपत्रांना पायबंद घालण्यासाठी परीक्षा परिषदेने उत्तीर्ण उमेदवारांचे प्रमाणपत्र व गुणपत्रक हे डिजिटल स्वरुपात देण्याचा निर्णय घेतला आहे.
अशी पडताळता येईल सत्यता
डिजिटल प्रमाणपत्रे व गुणपत्रक कायमस्वरूपी संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहेत. त्यामुळे उमेदवाराला तसेच नियुक्ती प्राधिकाऱ्याला प्रमाणपत्राची सत्यता एका क्लिकवर पडताळता येणार आहे. त्यासाठी प्रमाणपत्रावरील क्यूआर कोड स्कॅन करावा किंवा लिंक क्लिक करावी, परीक्षेचे नाव निवडावे, परीक्षा वर्ष व बैठक क्रमांक नमूद करावा, त्याानंतर सबमिट बटनावर क्लिक करताच संबंधित विद्यार्थ्यांची परीक्षेतील कामगिरी स्क्रीनवर दिसेल.
उमेदवारांचाही होणार फायदा
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पदभरतीसह विविध परीक्षा घेतल्या जातात. त्यांचा निकाल लागल्यानंतर उमेदवारांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी कधी कधी दोन महिने लागतात. टीईटीच्या उमेदवारांना तर तब्बल वर्ष-वर्षभर वाट पाहावी लागते. परंतु प्रमाणपत्र व गुणपत्रक डिजिटल स्वाक्षरीने दिले जाणार असल्यामुळे ते जास्तीत जास्त १५ दिवसांच्या आत मिळणार आहेत. सध्याच्या पद्धतीत परीक्षेसाठी नेमलेल्या संस्थेकडून प्रमाणपत्रे छापणे, त्यानंतर ती क्षेत्रीय कार्यालयामार्फत संबंधित शिक्षणाधिकारी, संस्था अथवा शाळांना पाठविणे, त्यांच्या मार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे या कामात बराच काळ लागतो. शिवाय या साखळीत कुठेतरी गैरप्रकार होऊन बोगस प्रमाणपत्रे तयार करण्यालाही वाव आहे.
टीईटीसोबतच याही परीक्षांसाठी डिजिटलचा निर्णय
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा, ऑनलाईन व मॅन्युअल टायपिंग, लघुलेखन परीक्षा, डीएड, एनटीएस, एनएमएमएस, शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी), तसेच विविध भरती परीक्षा घेतल्या जातात. या सर्वच परीक्षांची प्रमाणपत्रे आणि गुणपत्रके आता डिजिटल रूपात मिळणार आहेत. परीक्षा परिषदेतर्फे फेब्रुवारीमध्ये टायपिंग व शाॅर्टहॅन्डची (लघुलेखन) परीक्षा घेण्यात आली होती. त्यातील ६२ हजार ७०६ विद्यार्थ्यांना १ जुलै रोजी परीक्षा परिषदेने डिजिटल प्रमाणपत्र ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहे.
यापुढे परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्वच परीक्षांचे प्रमाणपत्र डिजिटल स्वरुपात दिले जाईल. त्याची सुरुवात टायपिंग व लघुलेखनच्या विद्यार्थ्यांना डिजिटल प्रमाणपत्र देऊन करण्यात आली. यापुढील काळात पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा, एनएमएमएस परीक्षा, डीएड व सर्वच परीक्षांचे प्रमाणपत्र डिजिटल असेल.
- शैलजा दराडे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद