यवतमाळ : केवळ स्वत:चे राजकीय इप्सीत साध्य करण्यासाठी काँग्रेस पक्षाचा वापर करणाऱ्या माणिकराव ठाकरे पिता-पुत्राने दारव्हा, दिग्रस, नेर या तालुक्याप्रमाणेच आता यवतमाळ तालुक्यालाही वाऱ्यावर सोडले आहे. त्यांच्या या कृतीची स्थानिक निष्ठावंतांना मात्र किंमत मोजावी लागत आहे. लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीत पक्षाला कधी नव्हे इतका दारूण पराभव पहावा लागला. याला जबाबदार कोण हे सर्वश्रूत आहे. पक्षातील अधिकाराच्या पदाचा उपयोग करून पित्याने पुत्राचे राजकीय पुनर्वसन करण्याचा चंग बांधला होता. या प्रयत्नात पुनर्वसन तर सोडाच पक्षांच्याच अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. एका चौकडीत बसून राजकारण करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकरावांनी स्वत:ला पद मिळविण्यासाठी नेहमीच जवळच्या कार्यकर्त्यांचा बळी दिला. काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ आणि राज्यपातळीवरचा नेता म्हणून काम करताना त्यांनी जिल्ह्यातील तर सोडाच आपल्या मतदारासंघातील-तालुक्यातील कार्यकर्त्यांलाही कुठे संधी दिली नाही. कार्यकर्त्यांची क्षमता वाढूच नये असाच पुरेपुर प्रयत्न झाला. याउलट मुलगा राहूलचे जिल्हा परिषदेनंतर राज्याच्या राजकाराणात कसे पुनर्वसन करता येईल याचाच प्रयत्न करण्यात आला. दारव्हा, दिग्रस आणि नेर येथे काँग्रेसजवळ एकही कार्यकर्ता शिल्लक नाही याची कल्पना आल्यानंतर या पिता-पुत्राने आपला मोर्चा यवतमाळ विधानसभा क्षेत्राकडे वळविला. (कार्यालय प्रतिनिधी)
ठाकरे पिता-पुत्राचा प्रताप : स्थानिक निवडणुकीत काँग्रेसचे कार्यकर्ते सैरभैर
By admin | Published: February 25, 2015 2:17 AM