यवतमाळ : शेतकऱ्यास पोलीस ठाण्यात बोलावून ठाणेदाराने लाथाबुक्क्यांनी व बाजीरावने मारहाण केली. यात त्याच्या तळहातावर गंभीर दुखापत झाली. त्यामुळे ठाणेदाराविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी तक्रार खरुस (बु ) येथील पीडित शेतकऱ्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांना पाठविलेल्या तक्रारीतून केली आहे.
खरुस येथील शेतकरी आनंदराव वानखेडे यांच्याविरोधात शेतातील रस्त्याबाबत वाद केल्याची तक्रार शेतकरी अवधूत वानखेडे यांनी २४ ऑक्टोबर रोजी उमरखेड पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर ठाणेदारांनी आनंदराव यांना ठाण्यात हजर होण्याचा निरोप बीट जमादारामार्फत दिला. तेथे हजर झालेल्या आनंदराव यास कॅबिनमध्ये बोलावून ठाणेदार अमोल माळवे यांनी खरूस येथील एका गावपुढाऱ्याच्या चिथावणीवरून वस्तुस्थितीची कुठलीही शहानिशा न करताच अश्लील शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली.
बाजीराव काढून दोन्ही तळहातांवर सपासप दहा ते बारा फटके मारले. यातून आनंदराव याच्या तळहाताला व दहाही बोटांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कलम १०७ नुसार कार्यवाही केली तेथे जमानत केल्यानंतर हाताच्या वेदना असह्य झाल्याने त्यांनी शासकीय रुग्णालयात उपचार घेतले.
ठाणेदार अमोल माळवे यांनी पैशाच्या लालसेपोटी अमानुष मारहाण केल्याने त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी. अन्यथा मला आमरण उपोषणास बसावे लागेल, असा इशारा आनंदराव वानखेडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना तक्रारीतून दिला आहे. निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलीस महासंचालक मुंबई, विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती यांना पाठविल्या आहेत.
खरुस (बु) येथील शेतकऱ्यांच्या परस्पर विरोधी तक्रारी केल्या होत्या. त्यामध्ये मी दोन्ही पार्टींला ठाण्यात बोलावले दोन्ही बाजू ऐकल्या. मारहाण केल्याचा आरोप धादांत खोटा आहे. मी कुणालाही मारहाण केली नाही.
- अमोल माळवे, पोलीस निरीक्षक, उमरखेड