यवतमाळ : केंद्र पुरस्कृत नव भारत साक्षरता मोहीम प्रभावीपणे राबविली जावी, यासाठी शिक्षकांना प्रेरित करण्याच्या उद्देशाने मंगळवारी जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली. मात्र या बैठकीत एकवटलेल्या जिल्ह्यातील सर्वच शिक्षक संघटनांनी या मोहिमेवर एकमुखी बहिष्कार कायम असल्याचे घोषित केले. तसे पत्रही प्रशासनाला सर्वांच्या स्वाक्षरीनिशी सोपविण्यात आले. त्यामुळे प्रशासनापुढे फार मोठा पेच निर्माण झाला आहे.
१५ वर्षावरील निरक्षरांचे सर्वेक्षण करणे व त्यांना अध्यापन करणे यासाठी राज्यात ‘नव भारत साक्षरता’ अभियान सुरू करण्यात आले आहे. मात्र सर्वच शिक्षक संघटनांनी सुरुवातीपासून या कामावर बहिष्कार घातला आहे. त्यामुळे अखेरचा उपाय म्हणून मंगळवारी जिल्हाधिकारी डाॅ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मैनाक घोष यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांची बैठक बोलावली होती. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात झालेल्या या बैठकीला प्राथमिक शिक्षणाधिकारी किशोर पागोर, उपशिक्षणाधिकारी प्रणिता गाढवे आदी उपस्थित होते. नव भारत साक्षरता मोहिमेचे गांभीर्य आणि गरज शिक्षकांच्या लक्षात आणून देण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुरेपूर प्रयत्न केला. मात्र शिक्षक संघटनांनी बहिष्काराची भूमिका शेवटपर्यंत कायम ठेवली. या बैठकीतच बहिष्काराचे पत्र देऊन संघटनांनी काढता पाय घेतला.
या बैठकीसाठी इब्टा शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वानखडे, सरचिटणीस सचिन तंबाखे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश उदार, प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक रेकलवार, सरचिटणीस संदीप मोहाडे, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष आसाराम चव्हाण, सचिव ए.व्ही.सरताबे, किरण मानकर, रमाकांत मोहरकर, शशिकांत खडसे, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप डंभारे, सचिव अमोल गोपाळ, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र वाघमारे, जिल्हाध्यक्ष तुषार आत्राम, जिल्हा सरचिटणीस स्वप्नील फुलमाळी, हयात खान, महेंद्र वेरुळकर, संतोष मरगडे, डाॅ. सतपाल सोवळे, डाॅ. अवधूत वानखेडे, पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे विनोद डाखोरे, शिक्षक सहकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चापेकर, संतोष किनाके, प्रोटानचे जिल्हाध्यक्ष किशोर राठोड, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शरद घारोड, मनिष लढी, सुरेंद्र दाभाडकर, जुनी पेन्शनचे नदिम पटेल, शंकर नेमाडे, गणेश भागवत, एस. के. रामटेके, शशिकांत लोळगे, सारंग भटूरकर, शिक्षक भारतीचे गजानन पवार, शहाजी घुले, मुख्याध्यापक संघटनेचे सचिन सानप, पुरोगामी संघटनेचे आनंद शेंडे, शेख शेरू यासह सर्वच संघटनांचे जिल्हाध्यक्ष, सचिव उपस्थित होते. मात्र अवघ्या अर्ध्या तासात बैठक आटोपती घ्यावी लागली.
राज्याचा फैसला जिल्ह्यात कायम
अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केल्यानंतरही शिक्षकांनी बहिष्कार मागे घेतला नाही. सोमवारी पुणे येथे शिक्षण संचालनालय (योजना) कार्यालयातही राज्यस्तरीय शिक्षक नेत्यांची बैठक घेण्यात आली. त्यात सर्वच शिक्षक नेत्यांनी नव भारत साक्षरता मोहिमेवर बहिष्कार कायम ठेवला. त्याच भूमिकेवर जिल्हास्तरीय पदाधिकारी ठाम असल्याचे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत शिक्षक संघटनांनी स्पष्ट केले.