यवतमाळ : वारंवार आवाहन करूनही नॅक मूल्यांकन करण्याकडे जिल्ह्यातील बहुतांश महाविद्यालयांनी दुर्लक्ष चालविले आहे. परंतु, आता याबाबत थेट उच्च शिक्षण संचालनालयानेच कठोर भूमिका घेत अशा महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया रोखण्यासह विद्यापीठ संलग्नता काढून घेण्याबाबत सक्त इशारा दिला आहे. त्याबरहुकूम संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठानेही जिल्ह्यातील अशा ५४ महाविद्यालयांना ताकिद दिली आहे. आता ऐन प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याच्या कालावधीत महाविद्यालयांची नॅक मूल्यांकनासाठी चांगलीच धावपळ उडणार आहे.
महाविद्यालयांमधील सोयी सुविधा आणि तेथील शैक्षणिक दर्जा याबाबत नॅक मूल्यांकन केले जाते. त्यासाठी राष्ट्रीय मूल्यांकन व प्रमाणन परिषद (नॅक) कार्यरत आहे. ८ ऑक्टोबर २०१० शासन निर्णयानुसार महाविद्यालयांनी मूल्यांकन व पुनर्मूल्यांकन करून घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे ज्यांची नॅक वैधता संपुष्टात आलेली आहे, अशा महाविद्यालयांनी ३१ मार्चपर्यंत मूल्यांकन व पुनर्मूल्यांकन करून घेणे आवश्यक होते. त्यासाठी संचालनालयाने २ मार्च रोजी महाविद्यालयांना अलर्टही केले होते. नॅककडे संस्था नोंदणी करून इस्टीट्यूशनल इनफाॅर्मेशन फाॅर क्वालिटी असेसमेंट (आयआयक्यूए) अहवाल नॅक कार्यालयाकडे सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते. तरीही बहुतांश महाविद्यालयांनी ही कार्यवाही टाळली आहे.
आता अशा महाविद्यालयांमध्ये २०२३-२४ या शैक्षणिक सत्राच्या प्रथम वर्ष प्रवेशाच्या पहिल्या दिवसापर्यंत आयआयक्यूए अहवाल नॅक कार्यालयास सादर न झाल्यास गंभीर कार्यवाहीचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार अशा महाविद्यालयांना विद्यापीठाकडून कोणतीही संलग्नता दिली जाणार नाही. त्यासाठी उच्च शिक्षण संचालक डाॅ. शैलेंद्र देवळाणकर यांनी २३ मे रोजी सर्वच विद्यापीठांना जागे केले. त्यानंतर अमरावती विद्यापीठानेही २६ मे रोजी जिल्ह्यातील संबंधित महाविद्यालयांना नॅक न केल्यास कार्यवाहीचा इशारा देणारे पत्र पाठविले आहे.
प्रत्येक महाविद्यालयाने गुणवत्ता वाढीसाठी नॅकला सामोरे गेलेच पाहिजे. ज्या महाविद्यालयांना सहा वर्षे झालीत किंवा दोन बॅचेस निघाल्या, त्या प्रत्येक महाविद्यालयाला हे मूल्यांकन बंधनकारक आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठीही ते गरजेचे आहे. नॅक मूल्यांकनाबाबतची सध्यस्थिती २९ मे रोजी सायंकाळी ५ वाजतापर्यंत गुगल लिंकवर पाठवावी लागेल.- डाॅ. संदीप वाघुळे, संचालक, इंटर्नल क्वालिटी अशुअरन्स सेल (आयक्यूएसी), अमरावती विद्यापीठ.