लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेत मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचा आरोप व तक्रारी करण्यात आल्या. त्यावरून हा मुद्दा विधिमंडळात लक्षवेधीच्या माध्यमातून मांडण्यात आला. यावर सहकार मंत्र्यांकडून चौकशी करून कारवाईचे आश्वासन देण्यात आले होते. त्याचा परिणाम बँक संचालकांच्या मालमत्तेचा व्यवहार गोठविण्यावर झाला आहे. सर्वांच्याच मालमत्तेचे विवरण शासनाने मागितले आहे. महिला सहकारी बँकेत अनेक कष्टकरी गोरगरिबांची खाती आहे. त्यांचा पैसा मनमानी पद्धतीने वापरण्यात आला. यातून ही बँक डबघाईस आली. आरबीआयने निर्बंध घातल्यानंतरही कर्जाची उधळपट्टी सुरूच होती. खातेधारकांना माहीत नसतानाही परस्पर कर्जाची उचल करण्यात आली. त्यामुळेच पुरेसे तारण नसतानाही बँकेने २२७ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले. याबाबत शासनस्तरावरून चौकशी लावण्यात आली आहे. १५ मार्च रोजी सहकार आयुक्त यांना कार्यासन अधिकाऱ्यांकडून पत्र देण्यात आले. त्यात बँकेतील अनियमिततेबाबत कलम ८३ अन्वये चौकशी करावी, यादरम्यान संबंधित बँकेच्या संचालकांनी मालमत्तेची विक्री करू नये, अथवा नातेवाइकांच्या नावावर हस्तांतरण करू नये, असे निर्देश आहेत. यासाठी महसूल व सहकार विभागाच्या यंत्रणेला अवगत करण्यात आले आहे. चौकशी तातडीने पूर्ण करून बँकेच्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी संबंधितांवर निश्चित करण्यात यावी, यामध्ये जबाबदार संचालक, मुख्याधिकारी, कर्मचारी यांची मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करावा, यातून आलेल्या रकमेतून ठेवीदारांच्या ठेवी अदा करण्याच्या सूचना आहेत. बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व त्यांचे पती यांच्या नावाने असलेल्या मालमत्तेची चौकशी करून लेखापरीक्षण अहवालाच्या आधारे संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, असे निर्देशही सहकार मंत्र्यांकडून देण्यात आले आहेत. सहकार मंत्र्यांच्या आदेशानंतर सहजिल्हा निबंधक वर्ग-१ यांनी येथील दुय्यम निबंधकांना बँकेतील संचालक, मुख्याधिकारी, त्यांचे पती यांच्याकडे असलेल्या मालमत्तेची माहिती गोळा करण्यास सांगितले आहे. त्याचा अहवाल सहकार विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था १९६० चे कलम ८३ अंतर्गत कायदेशीर चौकशी पूर्ण होईपर्यंत सर्व व्यक्तीच्या नावे असलेल्या मालमत्तेचे खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यात येऊ नये, असा आदेश देण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्र्यांच्या बँकेत विलीनीकरणाच्या हालचाली - बाबाजी दाते महिला बँकेत सर्वसामान्य ठेवीदारांची मोठी फसवणूक झाली. हक्काचे पैसे परत मिळवण्यासाठी येरझारा माराव्या लागत आहे. अशा स्थितीत ही बँक केंद्रीय मंत्र्यांच्या बँकेत विलीनीकरणाच्या हालचाली सुरू आहेत. त्यापूर्वी विदर्भ लेखा समितीकडून बँकेच्या व्यवहाराची पडताळणी केली जाणार आहे.
सहदुय्यम निबंधक १ व २ यांना महिला बँकेचे संचालक, अधिकारी-कर्मचारी यांच्या मालमत्तेचा अहवाल गोळा करण्याचे निर्देश दिले आहेत. हा अहवाल प्राप्त होताच सहकार मंत्र्याकडे पाठविण्यात येईल. - व्ही. डी. कळंबेसहजिल्हा निबंधक वर्ग-१