यवतमाळ : येथे शासन आपल्या दारी अभियानांतर्गत ३५ हजार शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मेेळाव्याला उपस्थित राहणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे फलक लागले आहे. यातच मराठा आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून सोमवारी सकाळी आर्णी मार्गावरील फलकावर काळे फासले तर काही ठिकाणी काही फलक फाडण्यात आले. मुख्यमंत्री येणार त्या मार्गावरील फलकाला काळे फासल्याने प्रशासनाची धावपळ उडाली.
शासन आपल्या दारी कार्यक्रमात मराठा आंदोलक निदर्शने करतील याची दाट शक्यता आहे. त्यासाठी पोलिसांनी प्रमुखांची धरपकड सुरू केली आहे. मराठा आंदोलकांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या फलकाला काळे फासल्यानंतर हे फलक काढण्यासाठी नगरपालिकेची यंत्रणा तातडीने कामाला लागली. मुख्यमंत्री येईपर्यंत आर्णी मार्गावरील असे सर्व फलक काढण्याचे काम सुरू होते. एकूणच परिस्थिती गंभीर असून पोलिस प्रशासनावर प्रचंड ताण आला आहे.
शेतकरी मेळाव्याला गर्दी जमविण्यासाठी प्रत्येक गावातून एसटी बसेस बोलविण्यात आल्या. महागाव, उमरखेड, पुसद या तालुक्यांमध्ये काही गावात मराठा आंदोलकांनी या बसेसला प्रवेश नाकारला. त्यामुळे एसटी बसेस रिकाम्याच परतल्या. सातत्याने घडामोडी सुरू असल्याने पोलिसांची प्रचंड धावपळ होत आहे. ३५ हजारांच्या जमावात मराठा आंदोलक ओळखायचे कसे हेही आव्हान पोलिसांपुढे आहे. पाणी, जेवण न मिळाल्याने महिला शेतकऱ्यांचा संताप
शासन आपल्या दारी अभियानासाठी गर्दी जमविण्याचे शासकीय कर्मचाऱ्यांना टार्गेट देण्यात आले. सकाळी केळापूर तालुक्यातून महिला शेतकऱ्यांची बस कार्यक्रमस्थळी आली. मात्र त्यांना दुपार होऊनही साधे पाणी, जेवणही मिळाले नाही. यामुळे संतापलेल्या महिलांनी एसटी बस परत काढा आम्हाला गावी नेऊन सोडा, अशी मागणी केली. यातच बसमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यासोबत महिलांचा वाद झाला. महिलांनी यावेळी आपला संताप व्यक्त केला. कार्यक्रमस्थळी अनेक ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. शिवाय मुख्यमंत्र्यांंना मुंबईतून येण्यास उशीर होत असल्याने येथे आणलेल्या नागरिकांचा संयम सुटू लागला आहे.