यवतमाळ : महागाव तालुक्यात गुरुवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काळी टेंभी येथील नाल्याला आलेल्या पुरात बैलबंडी वाहून गेली. यात बैलबंडीवरील महिला अद्याप बेपत्ता असून दोन बैलांचा मृत्यू झाला. इतर दोघे बचावले. ही घटना गुरुवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली.
कमलाबाई मारोती पवार (५५) रा. काळी टेंभी ता. महागाव असे पुरात वाहून गेलेल्या महिलेचे नाव आहे. गुरुवारी कमलाबाई पवार पतीसह शेतात गेली होती. दरम्यान दुपारी जोरदार पाऊस सुरू झाल्याने पती मारोती पवार कमलाबाई व मरगू मसू जाधव हे तिघे बैलबंडीने घरी परत येत होते. मात्र जोरदार पावसामुळे गावालगतच्या नाल्याला मोठा पूर आला. त्या पुराचा मारोती पवार यांना अंदाज आला नाही.
पुरातून सहज बैलबंडी निघून जाईल अशी त्यांना अपेक्षा होती. त्यामुळे त्यांनी बैलबंडीसह घराकडे परतण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच वेळी पाण्याचा मोठा लोंढा आल्याने बैलबंडीसह त्यावर बसलेले मारोती बळीराम पवार (६०), कमलाबाई पवार आणि मरगू जाधव पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेले. बंडीला बांधून असल्याने नाका तोंडात पाणी गेल्याने बैलांचा मृत्यू झाला.
मारोती पवार आणि मरगू जाधव पुराच्या पाण्यातून कसे तरी बाहेर पडले. मात्र कमलाबाई पवार पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्या. अद्याप त्यांचा शोध लागला नाही. तलाठी बी.जी. चव्हाण व महसूल यंत्रणेला याबाबत माहिती देण्यात आली. चव्हाण यांच्यासह यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. कमलाबाई पवार यांचा शोध घेणे सुरू आहे.