नेत्यांच्या पुत्रप्रेमाने काँग्रेस कार्यकर्त्यांचा सावध पवित्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2022 05:00 AM2022-04-03T05:00:00+5:302022-04-03T05:00:23+5:30
काँग्रेसची नेतेमंडळी अजूनही कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या मानसिकतेत नाहीत. नगरपंचायत निवडणूक ही खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांची निवडणूक होती. या निवडणुकीत सर्वाधिक सदस्य काँग्रेसचे निवडून आले. मात्र सत्तेच्या समीकरणात नेत्यांच्या बोटचेप्या भूमिकेमुळे संख्याबळ असूनही चार ठिकाणी विरोधी बाकावर बसावे लागले. नेत्यांना कार्यकर्त्यांच्या भवितव्याची नव्हे तर आपल्याच घरातील व्यक्तीला काँग्रेसमध्ये नेतेपदी बसविण्याची आस लागली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांच्या कुटुंबापुरतीच मर्यादित झाली आहे. कोणत्याच नेत्याला माजी झाल्यानंतरही पुत्रप्रेमाचा मोह सोडवत नाही. यामुळे अनेक वर्षे पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांनी आता सावध पवित्रा घेतला आहे. याचा परिणाम पक्षाच्या सदस्य नोंदणी मोहिमेवर झाला आहे. आतापर्यंत २८ हजार सदस्य नोंदणी झाली असून त्यासाठीही १५ दिवसांची मुदतवाढ घ्यावी लागली आहे.
काँग्रेसची नेतेमंडळी अजूनही कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या मानसिकतेत नाहीत. नगरपंचायत निवडणूक ही खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांची निवडणूक होती. या निवडणुकीत सर्वाधिक सदस्य काँग्रेसचे निवडून आले. मात्र सत्तेच्या समीकरणात नेत्यांच्या बोटचेप्या भूमिकेमुळे संख्याबळ असूनही चार ठिकाणी विरोधी बाकावर बसावे लागले. नेत्यांना कार्यकर्त्यांच्या भवितव्याची नव्हे तर आपल्याच घरातील व्यक्तीला काँग्रेसमध्ये नेतेपदी बसविण्याची आस लागली आहे. त्यामुळेच १६ तालुके असलेल्या २७ लाख लोकसंख्येच्या जिल्ह्यात जेमतेम २८ हजारांवर सदस्य नोंदणी झाली.
पक्षवाढीसाठी सदस्य नोंदणी अभियान राबविण्याचे ठरले. त्यासाठी मोबाईल लिंक देण्यात आली. मात्र नेत्याने पक्षाच्या कामात कधीच रस दाखविला नाही. याउलट युवक काँग्रेसच्या निवडणुकीत नेत्यांचे पुत्र उमेदवार म्हणून रिंगणात होते. त्यावेळी सामदामदंड भेद वापरून आपल्याच पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पराभव कसा होईल यासाठी जंगजंग पछाडले. परिणामी नेत्यांचे पुत्रच पक्षांतर्गत निवडणुकीत विजयी झाले. सामान्य कार्यकर्त्याला अपवादाने संधी मिळत असल्याने आता त्यांनीही पक्षकार्यातून आपले लक्ष कमी केल्याचे दिसून येते. त्यामुळेच सदस्य नोंदणीत काँग्रेस माघारली. यवतमाळ विधानसभेत तर जेमतेम १४०० सदस्य नोंदविता आले. हे पक्षाचे होत चाललेले अध:पतन मानले जात आहे. खासगीत कार्यकर्ते उघड नाराजी व्यक्त करीत आहे.
कार्यकर्ते घडविणाऱ्या लाेकनेत्याची वानवा
- जिल्ह्यातील काँग्रेसने राज्याला व देशाला अनेक प्रतिभावान नेते दिले आहेत. या नेत्यांनी खऱ्या अर्थाने लोकनेत्याची भूमिका बजावत पक्षातील कार्यकर्त्यांनाही वेळोवेळी संधी दिली. त्यामुळेच पक्ष सतत सत्तेत होता. मात्र, नंतरच्या काळात पक्षात साठमारी होऊ लागली. आमदार, मंत्री असलेल्यांनी कार्यकर्त्यांऐवजी स्वत:च्या मुलांनाच पद मिळावे यासाठी परिश्रम घेणे सुरू केले. परिणाम सामान्य कार्यकर्ता पक्ष कार्यातून अलिप्त राहू लागला. याचा फटका विधानसभा, लोकसभा निवडणुकीत सातत्याने बसला आहे. आताही कार्यकर्त्यांना बळ देणाऱ्या लोकनेत्याची काँग्रेसला व जिल्ह्याला गरज भासत आहे.