लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : येथील एका व्यावसायिकाने आर्णी पाेलीस ठाणे गाठून मंगळवारी तक्रार दिली. अज्ञात व्यक्तीकडून मुलाचे अपहरण करीत त्याला ठार करण्याची धमकी दिली जात आहे. त्या मोबदल्यात एक लाखाची खंडणी मागितली आहे. आर्णीसारख्या लहानशा गावात खंडणीचा प्रकार घडल्याने पोलिसांनीही कसून शोध घेणे सुरू केले. यात फिर्यादीचा मुलगाच फेक आयडी वापरून वडिलांना धमकावत असल्याचे पुढे आले. शाळकरी विद्यार्थी असलेल्या मुलाने वडिलांकडून पैसे काढण्यासाठी नवीनच शक्कल लढविली. त्याने फेक आयडी तयार करून फेसबुकच्या माध्यमातून वडिलांना धमकावणे सुरू केले. यासाठी त्याने आकाश गिरोलकर व नंतर विनय टाके ही नावे धारण केली. दोन्ही फेक आयडींचा वापर करीत वारंवार वडिलांनाच धमक्या देणे सुरू केले. इतकेच नव्हेतर, त्याने मुलाचा खून केला जाईल, त्याच्या पोस्टमार्टमची तयारी ठेवा, अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या. या प्रकरणी गुन्हा नोंद केला होता.
मुलांच्या मोबाईल वापराने पालक झाले चिंतित - सायबर सेलच्या माध्यमातून या गंभीर गुन्ह्याचा तपास पोलिसांनी सुरू केला. यात धक्कादायक वास्तव पुढे आले. इयत्ता दहावीला असलेल्या मुलानेच वडिलांना ब्लॅकमेल करणे सुरू केले. नेमके पैसे कशासाठी मागत होता, याची चौकशी आर्णी पोलीस करीत आहेत. मात्र, या गंभीर प्रकरणानंतर पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. शाळकरी मुलांमध्ये मोबाईल व समाज माध्यमांची मोठी क्रेझ आहे. त्याचा वापर अशा पद्धतीने होत असेल तर पालकांनी काय करावे, हा प्रश्न आहे.